‘हृदयांतर’ची व्हॅनकुवर चित्रपट महोत्सवासाठी निवड!

सामना ऑनलाईन । मुंबई

विक्रम फडणीस निर्मित-दिग्दर्शित हृदयांतर हा चित्रपट ७ जुलैला चित्रपटगृहात झळकला आहे. चित्रपटाला भरघोस प्रतिसाद मिळतोय. मुक्ता बर्वे, सुबोध भावे, तृष्णिका शिंदे, निष्ठा वैद्य, अमित खेडेकर, मीना नाईक आणि सोनाली खरे ह्यांच्या अभिनयाने सजलेल्या हृदयांतर चित्रपटाला समीक्षकांकडून पाठीवर थाप तर मिळालीच, पण त्यासोबतच पहिल्याच विकेन्डला तिकीट खिडकीवर गल्ला जमवण्यातही यश मिळालंय.

यंदा ऑगस्टमध्ये होणाऱ्या मेलबर्न इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये नुकतीच हृदयांतरची निवड केली गेली होती. आणि आता या चित्रपटाची आणखी एका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड झालीय. व्हॅनकुवर इंटरनॅशनल साउथ एशियन फिल्म फेस्टिव्हलसाठी हृदयांतरची अधिकृतरित्या निवड झाली आहे.

हृदयांतर रिलीज होत असतानाच दुसरीकडे चित्रपटाचा अशाप्रकारे आंतरराष्ट्रीय पातळीवर होत असलेल्या गौरवाने निर्माते-दिग्दर्शक विक्रम फडणीस फारच भारावून गेले आहेत. विक्रम म्हणतात, “सध्या हृदयांतरला रसिकांकडून जे भरभरून प्रेम मिळत आहे, त्याने मी अत्यंत खूश आहे. मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलमध्ये हृदयांतरची अधिकृतरित्या निवड झाली होती. आणि आता सातव्या व्हॅनकुवर आंतरराष्ट्रीय साऊथ आशियाई फिल्म फेस्टिव्हलमध्येही हृदयांतर निवडली गेलीय. हृदयांतर जी यशोशिखर पदाक्रांत करतंय, त्याने मी खूप सुखावलो गेलो आहे. हृदयांतरने रसिकांच्या मनाचा ठाव घेतलाय, हे नक्कीच.”

“सुबोध भावे, मुक्ता बर्वे, सोनाली खरे, अमित खेडेकर, आमच्या चित्रपटातल्या दोन लहान मुली आणि माझ्या संगीत दिग्दर्शकासह चित्रपटाशी निगडीत प्रत्येक कलाकार सध्या चित्रपटाला मिळत असलेल्या प्रतिसादाने सुखावला गेलाय. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्याच आठवड्यात दोन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सावातून आमंत्रण येणं, ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे.”

आपली प्रतिक्रिया द्या