प्रणॉयचे बॅडमिंटनमधील ऐतिहासिक विजेतेपद; मलेशिया मास्टर्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला हिंदुस्थानी

हिंदुस्थानचा स्टार खेळाडू एचएस प्रणॉयने मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत ऐतिहासिक विजेतेपद संपादन केले. त्याने अंतिम लढतीत चीनच्या वेंग होंग यांगचा पराभव करून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो हिंदुस्थानचा पहिला पुरुष बॅडमिंटनपटू ठरला. तो सायना नेहवाल व पी. व्ही. सिंधू यांच्यानंतर ही स्पर्धा जिंकणारा तिसरा हिंदुस्थानी खेळाडू ठरला हे विशेष !

प्रणॉयने चुरशीच्या सुवर्णपदकाच्या लढतीत वेंग होंग यांगवर 21-19, 13-21, 21-18 असा विजय मिळवत इतिहास घडविला. ही लढत 94 मिनिटांपर्यंत रंगली. यंदाच्या हंगामातील त्याचे हे पहिलेच विजेतेपद होय. प्रणॉयच्या रूपाने हिंदुस्थानी पुरुष खेळाडूला या स्पर्धेत मिळालेले हे पहिलेच विजेतेपद असले तरी महिला गटात हिंदुस्थानला तीन सुवर्णपदके मिळालेली आहेत. यात पी. व्ही. सिंधूने दोनदा, तर सायना नेहवालने एकदा ही स्पर्धा जिंकलेली आहे.

हिंदुस्थानची आघाडीची खेळाडू पी. व्ही. सिंधू हिचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले होते. याचबरोबर लक्ष्य सेन, किदाम्बी श्रीकांत व मालविका बनसोड यांचेही स्पर्धेतील आव्हान आधीच संपुष्टात आले होते. मलेशिया मास्टर्स स्पर्धेत जगभरातील 84 खेळाडूंनी सहभाग घेतला होता, तर दुहेरी गटात 108 जोडय़ांनी सर्वस्व पणाला लावले.