बारावीचा पहिला पेपर गोंधळाचा; परीक्षेच्या आदल्या दिवशी सेंटर बदलले

मुंबई – बारावीची परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांचा पहिला पेपर गोंधळाचा ठरला. परीक्षेच्या आदल्या दिवशी काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा केंद्रात अचानक बदल करण्यात आला. बहुतांश विद्यार्थ्यांना या बदलाची माहितीच नसल्याने ते आज पालकांसमवेत हॉल तिकिटावर नमूद केलेल्या परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचले, पण तेथे गेल्यावर त्यांना परीक्षेची बैठक व्यवस्था वेगळ्या केंद्रावर केल्याचे समजताच विद्यार्थी-पालकांचा एकच गोंधळ उडाला.

मुंबई विभागीय मंडळातून बारावीच्या परीक्षेला बसणाऱया विद्यार्थ्यांची संख्या यंदा वीस हजारांनी वाढली आहे. या वाढीव विद्यार्थ्यांच्या परीक्षेची व्यवस्था करताना शिक्षण मंडळाच्या नाकीनऊ आले आहेत. आज सकाळी अकरा वाजता बारावीच्या सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स शाखेच्या विद्यार्थ्यांची इंग्रजी विषयाची परीक्षा होती. मात्र आजचा पहिला पेपर काही विद्यार्थ्यांना तापदायक ठरला. शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांची ज्या परीक्षा केंद्रावर व्यवस्था केली होती तेथे विद्यार्थ्यांचा लोड वाढल्याचे लक्षात येताच अचानक आदल्या दिवशी वाढीव विद्यार्थ्यांची व्यवस्था त्या परीक्षा केंद्रानजीकच्या शाळेत करण्यात आली. आदल्या दिवशी केलेल्या या बदलामुळे नव्याने अस्तित्वात आलेल्या परीक्षा केंद्रावरील शिक्षकांची यंत्रणा तातडीने कामाला लागली.

दादर येथील ऍण्टोनिया डिसिल्व्हा हायस्कूल व मालाड येथील मित्तल कॉलेज या परीक्षा केंद्रावरील जादा विद्यार्थ्यांना अन्य शाळेत हलविण्यात आले. डिसिल्व्हा हायस्कूलमधील विद्यार्थ्यांची व्यवस्था नाबर गुरुजी विद्यालय तर मित्तल कॉलेजमधील विद्यार्थ्यांची व्यवस्था सीजीएस मिशन हायस्कूलमध्ये करण्यात आली. तसेच वांद्रे येथील अंजुमन इस्लाम हायस्कूल या परीक्षा केंद्रावरील जादा विद्यार्थ्यांची व्यवस्था वांद्रे हिंदू असोसिएशन या शाळेत करण्यात आली.

या तीन परीक्षा केंद्राबरोबरच मुंबईतील अन्य परीक्षा केंद्रांवरदेखील असाच गोंधळ उडाला. परीक्षेला बसलेल्या वाढीव वीस हजार विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेचे आयोजन करण्याचे आव्हान शिक्षण मंडळासमोर आहे.

पालकांची पळापळ; विद्यार्थी टेंशनमध्ये

डिसिल्व्हा हायस्कूलमध्ये परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रबदलाचे कळताच धक्काच बसला. परीक्षेला अवघा अर्धा तास शिल्लक असताना तब्बल १०० विद्यार्थ्यांना डिस्लिव्हा हायस्कूल ते नाबर गुरुजी शाळेपर्यंत पायपीट करून जावे लागले. नाबर गुरुजी शाळा हे परीक्षा केंद्र नव्हते. काल अचानक या शाळेचे रूपांतर परीक्षा केंद्रात झाले. या केंद्रावर बारावीचे इंग्रजीसह केमिस्ट्री, मॅथ्स, फिजिक्स हे चारच पेपर होणार असून उर्वरित दोन विषयांच्या परीक्षा या डिसिल्व्हा शाळेतच होणार आहे. नाबर गुरुजी शाळेची वेळ बारावीच्या परीक्षेमुळे बदलण्यात आली आहे. पण शुक्रवार महाशिवरात्रीपासून तीन दिवस शाळांना सुट्टी आल्याने शाळेची नवीन वेळ विद्यार्थ्यांना माहीतच नव्हती.

हा अचानक झालेला बदल नाही…

केंद्रातील बदल हा अचानक झालेला नाही. परीक्षेच्या आदल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना संपर्क साधून परीक्षा केंद्रातील बदलाची माहिती दिली होती. ज्या परीक्षा केंद्रात क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत, फक्त तेथील बैठक व्यवस्थाच त्या परीक्षा केंद्राशेजारील शाळेत करण्यात आली आहे. परीक्षा केंद्राबाहेर कालपासूनच या बदलाबाबतच्या सूचनेचा फलक लावण्यात आला होता. – सि. या. चांदेकर, सचिव, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुंबई विभागीय शिक्षण मंडळ