बारावीच्या परीक्षेचा येळकोट, एसपीचाही पेपर फुटला

52
exam
प्रातिनिधिक फोटो

नवी मुंबई –  बारावीची परीक्षा सुरू झाल्यापासून गेल्या पाच दिवसांत पेपरफुटीची मालिका सुरूच झाली आहे. मराठीच्या पेपरपाठोपाठ आज एसपी (सेक्रेटरियल प्रॅक्टिस) या विषयाचा पेपर पुन्हा फुटला. परीक्षा सुरू होण्याअगोदरच पेपर सोशल साइटवर आल्यामुळे याप्रकरणी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने वाशी पोलीस ठाण्यात आज पुन्हा गुन्हा दाखल केला. कालच मराठीचा पेपर फुटल्याचा गुन्हा दाखल झालेला असताच आज पुन्हा दुसऱयांदा गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

बारावीचा मराठीचा पेपर २ मार्च रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत झाला, मात्र सदर विषयाच्या प्रश्नपत्रिकेची काही पाने ११ वाजण्यापूर्वीच सोशल मीडियावर आली होती. सुरुवातीला ही शक्यता शिक्षण मंडळाने फेटाळून लावली होती, मात्र काल मंडळाचे सहसचिव एस. आर. बोरसे यांनी वाशी पोलिसांना या पेपरफुटीची माहिती दिली. त्यानुसार मंडळाचे विभागीय अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पुन्हा आज ‘एसपी’ची प्रश्नपत्रिकाही ११ पूर्वीच सोशल मीडियावर आल्यामुळे आज पुन्हा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला. पेपरफुटीचे एकापाठोपाठ एक प्रकार घडल्यामुळे परीक्षा पुन्हा घेतली जाते की काय या भीतीने विद्यार्थी आणि त्यांचे पालक धास्तावले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या