दहावी-बारावीच्या निकालावर बहिष्कार, लोकल प्रवासाची मुभा नसल्याने शिक्षकांमध्ये संतापाची लाट

मुंबई आणि उपनगरातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सलग पाचव्या दिवशीही लोकल प्रवासाची परवानगी मिळाली नसल्याने संतापाची लाट पसरली आहे. लोकलने प्रवासाची सवलत न मिळाल्यास दहावी-बारावी निकालाच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा शिक्षक संघटनांनी दिला आहे. याची दखल घेत शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आपण यविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून यावर दोन दिवसांत निर्णय होईल, असे आश्वासन दिले आहे.

दहावीच्या मूल्यांकनाचे कामकाज करण्यासाठी शिक्षकांना शाळांमध्ये उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्यासाठी 9 जुलैपासून महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटना, शिक्षक परिषदेने मुंबईबाहेर राहणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतरांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी अशी मागणी लावून धरली आहे. मुंबई, ठाणे जिह्यात शिक्षकांनी रेल्वे स्थानकांवर जाऊन आंदोलनही छेडले होते. त्यानंतर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दोन दिवसांपूर्वीच यावर निर्णय होईल असे आश्वासन दिले होते, मात्र त्यावर आजही निर्णय न झाल्याने शिक्षक संघटना संतापल्या आहेत.

दहावीच्या निकालासाठी शिक्षक प्रवासाच्या अनेक यातना सहन करून शाळांमध्ये येत आहेत. काहींना ते अशक्य होत आहे. यामुळे निकाल लागण्यासाठी उशीर झाला तर यासाठी सर्व जबाबदारी सरकारवर राहील, असा इशारा शिक्षक परिषदेने दिला आहे. दहावीच्या परीक्षेचे कामकाज पाहणाऱ्या शिक्षकांची संख्या ही फार मोठी नाही. यामुळे त्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा दिली असती तर फार अडचणी आल्या नसत्या, असे शिक्षण क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुधीर घागस यांनी सांगितले. दरम्यान, सरकारने लवकर शिक्षकांना लोकल प्रवासाची मुभा दिली नाही तर आम्ही निकाल प्रक्रियेच्या कामकाजावर बहिष्कार टाकू, असा इशारा शिक्षक भारतीने शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना दिला आहे. तसे निवेदनही संघटनेच्या वतीने अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी शिक्षणमंत्र्यांना दिले.

आपली प्रतिक्रिया द्या