माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे वाढदिवशीच निधन

उरणचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. 15 जुलै रोजी त्यांचा वाढदिवस होता. त्यांच्या पार्थिवावर सातीर्जे या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

अलिबाग तालुक्यातील झिराड ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य आणि 2004 ते 2009 या काळात अलिबाग- उरण मतदारसंघाचे ते आमदार होते. रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष, प्रदेश कॉग्रेसचे विशेष निमंत्रित सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. मधुकर ठाकूर यांनी 2004 मध्ये शेकापच्या तत्कालीन राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचा पराभव करीत राज्याचे लक्ष वेधून घेतले होते. अलिबागमध्ये तब्बल 32 वर्षांनी त्यावेळी शेकापचा पराभव झाला होता. त्यानंतर ठाकूर यांचा राजकीय प्रवास अतिशय वेगवान झाला. तत्कालीन दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी त्यांचे अत्यंत जिव्हाळय़ाचे संबंध होते.

आपली प्रतिक्रिया द्या