वुहानमध्ये उपचार करणाऱ्या डॉक्टरचा मृत्यू, चीनच्या नागरिकांमध्ये पुन्हा घबराटीचे वातावरण

891

वुहानमधील कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या आणखी एका डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. हू वेईफेंग असे या डॉक्टरचे नाव आहे. धक्कादायक बाब ही आहे की उपचाराला सुरुवात झाल्यानंतर वेईफेंग यांची कातडी वेगाने काळी पडायला लागली होती. मृत्यू होईपर्यंत त्यांच्या त्वचेचा रंग पूर्णपणे बदललेला होता. मार्च महिन्यामध्ये त्यांची त्वचा काळवंडल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्वचा काळवंडण्यामागे यकृत निकामी होणे हे कारण असल्याचं सांगण्यात आलं होतं.

वेईफेंग यांना कोरोनाची लागण झाली होती आणि गेले 4 महिने त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाहीये. वेईफेंग यांच्या निधनाचे वृत्त समजताच चीनमधल्या नागरिकांनी समाज माध्यमांद्वारे त्यांची भीती बोलून दाखवायला सुरुवात केली आहे. यातल्या अनेकांनी संतापही व्यक्त केला आहे.

कोण होते वेईफेंग?
वेईफेंग हे मूत्राशयासंबंधित विकाराचे तज्ज्ञ डॉक्टर होते. कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर त्यांनी वुहानमधील रुग्णालयात रुग्णसेवेला सुरुवात केली होती. जानेवारीमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना विविध रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आले. मार्चमध्ये त्यांच्या प्रकृतीमध्ये थोडी सुधारणा झाली होती, मात्र मेंदूविकारामुळे मे महिना उजाडेपर्यंत त्यांची प्रकृती पुन्हा चिंताजनक बनली होती. वेईफेंग आणि त्यांचे सहकारी डॉक्टर यी फॅन यांच्याबाबत एप्रिल महिन्यात चीनमधील सरकारी वृत्तसंस्थेने कोरोनाविरूद्ध या दोघांच्या लढ्याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. जेव्हा या दोघांची दृश्ये लोकांना दिसली तेव्हा त्यांची त्वचा काळवंडलेली पाहून अनेकांना धक्का बसला होता. चीनी माध्यमांनी यकृत नीट काम करत नसल्याने त्वचा काळवंडल्याचे म्हटले होते. 6 मे रोजी यी फॅन हे बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले. मात्र डॉ.हू यांच्यावर उपचार सुरूच होते. चीनमधल्या घटनांचे वार्तांकन करणाऱ्या अनेक वर्तमानपत्रांनी म्हटले आहे की कोरोनाचा सगळ्यात पहिला इशारा देणारे डॉक्टर ली वेंगलिआंग हे ज्या रुग्णालयात काम करत होते त्याच रुग्णालयात डॉ.हू देखील काम करत होते. ली वेंगलिआंग यांनी तोंड बंद ठेवावं यासाठी चीनमधल्या प्रशासनाने हरतऱ्हेचे प्रयत्न केल्याचा आरोप केला गेला आहे. वेंगलिआंग यांच्या मृत्यूनंतर चीनमध्ये संतापाची लाट उसळली होती, तशीच ती आता डॉ.हू यांच्या मृत्यूनंतरही उसळली आहे. अनेकांनी प्रश्न विचारला आहे की वुहानमधील मृत्यूंसाठी नेत्यांना जबाबदार धरलं जाणार आहे की नाही?

आपली प्रतिक्रिया द्या