गद्दार संजय मंडलिकांच्या घरावर शिवसैनिकांचा प्रचंड मोर्चा

‘राहिले ते सोने आणि गेले ते बेन्टेक्स’, असे म्हणत स्वतःच शिवसेनेशी गद्दारी करत शिंदे गोटात शिरलेले खासदार संजय मंडलिक यांच्या घरावर आज शिवसैनिकांनी मोर्चा काढला. यावेळी शिवसेनेने तुम्हाला काय कमी केले म्हणून अशी गद्दारी केली? असा सवाल करीत स्वर्गीय सदाशिव मंडलिक यांचा स्वाभिमान का पायदळी तुडविला याचे उत्तर द्या, असा जाब शिवसैनिकांनी खासदार मंडलिक यांना विचारला. तसेच जेवढय़ा मताने निवडून आलात, आता तेवढय़ाच मताने पराभव करू, असा इशाराही संतप्त शिवसैनिकांनी दिला.

शिवसेनेची गद्दारी करत 40 आमदार फुटले. कोल्हापुरातूनही आमदार प्रकाश आबिटकर, माजी राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे दोघे शिंदे गटाला जाऊन मिळाले. त्यावेळी गद्दार आमदारांविरोधात सर्वप्रथम कोल्हापुरात शिवसैनिकांनी निषेध मोर्चा काढला होता.