कोरोना संसर्गात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचा कुटुंबप्रमुख या भूमिकेतून परिस्थिती हाताळली. ते जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील, असा विश्वास शिवसेनेचे तालुकाप्रमुख डॉ.श्रीकांत पठारे यांनी व्यक्त केला. मशाल यात्रेदरम्यान ते बोलत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पारनेर तालुक्यात तालुकाप्रमुख डॉ.श्रीकांत पठारे यांच्या नेतृत्त्वाखाली भगव्या सप्ताहानिमित्त मशाल यात्रा आयोजित करण्यात आली आहे.
या मशाल यात्रेला तालुक्यातून नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यातील गावोगावी आणि वाड्यावस्त्यांवर या यात्रेचे जल्लोषात स्वागत केले जात आहे. मशाल यात्रेदरम्यान आपण विविध गावांतील नागरिकांशी संवाद साधत आहोत. त्यांच्या सार्वजनिक, वैयक्तिक समस्या जाणून घेत आहोत. यावेळी सर्वसामान्य नागरीक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करीत असल्याचे पठारे यांनी सांगितले.
पारनेर-नगर मतदारसंघाची विधानसभेची जागा महाविकास आघाडीमधून शिवसेनेलाच मिळावी अशी मागणी सर्वसामान्यांमधून होत असल्याचे पठारे म्हणाले. तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथून सुरु झालेली मशाल यात्रा ढवळपुरी, कान्हूर पठार जिल्हा परिषद गटातील गावागावात व वाड्या-वस्त्यांवर पोहचली आहे. शिवसेनेच्या मशाल चिन्हाचा प्रचार प्रसार याठिकाणी करण्यात आलेला आहे. सुपे व निघोज गटामध्ये आता ही यात्रा पोहचणार असून नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यात येत आहेत. यात्रा संपल्यावर नागरिकांच्या समस्या, अडचणी दूर करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे डॉ.पठारे पुढे म्हणाले.