अल्पसंख्याक समाजावरील हल्ले रोखण्यात मोदी सरकार अपयशी!

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आंतरराष्ट्रीय संस्था ‘ह्यूमन राइट वॉच’ने मानवाधिकारांवर जागतिक अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार हिंदुस्थानात अल्पसंख्याक समाजांवर होणारे हल्ले रोखण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याचे म्हटले आहे. यामुळे मोदी सरकारची जागतिक स्तरावर नाचक्की झाल्याचं म्हटलं जात आहे.

एका खासगी हिंदी वृत्तपत्राने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. या वृत्तानुसार, अहवालाच्या सुरुवातीलाच म्हटले आहे की, हिंदुस्थानात वर्ष २०१७ मध्ये अल्पसंख्याक समाजावर अन्याय झाल्यास सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांवर भाजप समर्थक आणि लोकांच्या समूहाने धमकावल्याचे तसेच हल्ले केल्याचे प्रकार पाहायला मिळाले आहेत. तसेच अशा हल्ल्यांची अथवा धमकी देण्यात आलेल्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी देखील करण्यात आलेली नाही, असेही या अहवात म्हटले आहे. इतकेच नाही तर भाजपचे काही वरिष्ठ नेतेच हिंसाचाराला खतपाणी घालत असल्याचा ठपकाही यामध्ये ठेवण्यात आला आहे.

मोदी सरकारच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर देखील घाला घातला गेला असून सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, अभ्यासकांनी आपले विचार प्रकट केल्यानंतर ते सरकारविरोधी वाटल्यास त्यांचा आवाज दाबण्याचेही प्रयत्न झाले आहेत. तसेच सरकारच्या धोरणांवर टीका करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना फॉरेन फंडिंगशी संबंधित नियमांचा गैरवापर करून त्यांची अडवणूक करण्यात आली, असेही या अहवालात म्हटले आहे.

या अहवालात कथित गोरक्षकांचा उत्पात, दलितांना मारहाण, बाबा राम रहीमच्या अटकेनंतर हरयाणा-पंजाबमध्ये झालेल्या दंगली, यासर्व घटनांचा उल्लेख करण्यात आल्याचे देखील म्हटले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अन्य काही संघटनांची नावे देखील यामध्ये घेण्यात आली आहेत, असेही या वृत्तात म्हटले आहे. जगभरातील ९० देशांमधील मानवाधिकारांसंदर्भातील अहवाल या संस्थेकडून जाहीर केला जातो. असा अहवाल देण्याचे ह्यूमन राइट वॉच संस्थेचे २८ वे वर्ष आहे.

4 प्रतिक्रिया

 1. भारत अजुनही विकसनशील देश का आहे?

  स्वातंत्र्यप्राप्तीला सत्तर वर्षे होऊन गेल्यानंतर सुद्धा आपला देश अजूनही विकसनशील देश का होता आणि आहे याचा उलगडा करणारा एक दृष्टांत आहे. एका गावात काही मुंग्या होत्या. त्या अगदी प्रामाणिकपणे कष्ट करून स्वतःचे आणि स्वत:च्या कुटुंबाचे पालनपोषण करत असत. त्या गावात काही नाकतोडे ही होते. ते मात्र दिवसभर मिळेल ते खाऊन, उद्याची चिंता न करता मस्त ऐष करत असत. स्वतःच्या कुटुंबियांचीही ते नीटपणे काळजी घेत नसत. नेहमी कष्ट करणाऱ्या मुंग्यांकडे बघून ते नेहमी त्यांची थट्टा करत. एके वर्षी उन्हाळा सुरू होण्याआधी, मुंग्यांनी एकत्र येऊन त्यांच्यासाठी वारूळ बनवायला सुरूवात केली. पाऊस आणि थंडीचाही त्रास होणार नाही अशी अगदी योग्य जागा निवडून प्रत्येक मुंगीने वारूळासाठी लागणारी माती तोंडात धरून त्या जागी आणायला सुरूवात केली. हे करत असतांना त्यांनी आपली नेहमीची कामे करून आपले आणि आपल्या कुटुंबियांचेही पोट भरेल याचीही खबरदारी घेतली आणि एकीकडे जसे जमेल तसे सर्वच मुंग्या वारूळासाठी माती आणतच होत्या. त्यांचे हे “नसते उपद्व्याप” बघून, सर्व नाकतोडे त्यांची अधिकच टर उडवू लागले. एकीकडे त्यांची मौजमजाही सुरूच होती. पण त्यांच्याकडे लक्ष न देता सर्व मुंग्यांनी आपले काम एकोप्याने, नेटाने आणि जिद्दीने सुरूच ठेवले. काही महिन्यांनंतर मुंग्यांचे मोठे सुरक्षित असे कलापूर्ण वारूळ तयार झाले. पावसाळा सुरू होण्याआधी सर्व मुंग्या त्या वारूळात जाऊन राहू लागल्या. हे करत असतांना त्यांनी आपल्या अन्नाची बेगमीही वारूळातच करून ठेवली होती. धो धो पाऊस सुरू झाल्यावर सर्व नाकतोडे हैराण झाले, पावसात भिजू लागले आणि त्यांनी बघितले तर मुंग्या आरामात त्यांच्या वारूळात राहात होत्या. पूढे हिवाळा आल्यावर तर सर्वच नाकतोडे थंडीने गारठून गेले. त्यांना खायलाही काही अन्न मिळेला आणि सगळेच जण मरायला टेकले. मात्र सर्व मुंग्या आपल्या कुटुंबियांसह हे बघितल्यावर सर्व नाकतोड़्यांचे पित्त खवळले. त्यांनी लगेचच एक पत्रकार परिषद बोलावली. त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मागणी केली की केवळ मुंग्यांनाच का राहण्यासाठी वारूळ मिळाले आणि त्यांना खायला भरपूर अन्नही मिळते आहे मग, आम्ही काय पाप केले आहे, आम्हालाही राहण्यासाठी फूकटात जागा मिळालीच पाहिजे आणि खायला अन्नही मिळायला हवे, ते ही फूकटातच ! देशातील सर्व प्रसारमाध्यमांनी आणि वाहिन्यांनी आपल्या वारूळामध्ये आरामात राहणाऱ्या मुंग्या आणि थंडीमध्ये काकडणारे “बिचारे” नाकतोडे यांची छायाचित्रे प्रसिद्ध करून आणि लाईव्ह शोज दाखवून नाकतोड़्यांच्या समस्यांना वाचा फोडली. हे बघून सर्व देशामध्ये संतापाची लाट उसळली. गरीब बिचाऱ्या नाकतोड्यांवर हा अन्याय का असा प्रश्न सर्व वाहिन्या, प्रसारमाध्यमे विचारू लागले. अरुंधती रॉय यांनी नाकतोड्यांच्या “न्याय्य” हक्कासाठी संसदेसमोर धरणे सुरू केले. मेधा पाटकरांनी नाकतोड़्यांना, मुंग्यांच्या घराहूनही अधिक आरामदायक, घर सरकारने बनवून द्यावे आणि त्यांच्या खाण्यापिण्याचीही मोफत व्यवस्था करावी, म्हणून आमरण उपोषण सुरू केले. मायावतींनी गरीब बिचाऱ्या नाकतोड्यांवर अन्याय होतो आहे म्हणून टाहो फोडला. केरळच्या कम्युनिस्टांनी मुंग्यांना अधिक श्रम करू देऊ नये असा कायदा करावा, म्हणजे हिवाळ्यात त्यांना आरामशीर राहता येणारच नाही आणि मुंग्या आणि नाकतोडे यांच्यामध्ये समानता येईल, असा प्रस्ताव सरकारकपूढे ठेवला. ममता बॅनर्जींनी त्यांना अनुमोदन दिले. राहुल गांधी आणि त्यांच्या काँग्रेस पक्षाने कम्युनिस्टांचे समर्थन करून संसदेत हा प्रश्न उपस्थित करून नाकतोड्यांवर होणाऱ्या अन्याय नष्ट करण्यासाठी सरकारला कायदा करण्यास भाग पाडू अन्यथा संसदेमध्ये कामे होऊच देणार नाही असे जाहीर केले. माजी रेल्वे मंत्री लालुप्रसाद यादव यांनी सर्व नाकतोड्यांना एका रेल्वेचे सर्व डबे राहण्यासाठी देऊन त्या रेल्वेला “नाकतोडा रथ” असे नाव देण्याची मागणी केली. काही संघटनांनी या प्रकरणी चौकशी करून नाकतोड़्यांवरील अन्याय दूर केला नाही तर सर्व देशामध्ये दंगली घडवण्याची आणि जाळपोळ करण्याची धमकीही दिली. अखेर सर्वांच्या दबावाला बळी पडून या प्रकरणी एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली आणि त्या समितीने नाकतोड्यांवरील या अन्यायाचा आणि दहशतवादाचा नि:प्पात करण्यासाठी “नाकतोडा दहशतवादविरोधी कायदा” बनवण्याची सरकारला शिफारस केली. शिक्षण मंत्र्यांनी नाकतोड्यांना शैक्षणिक संस्था, सरकारी कार्यालये आणि इतर संस्थांमध्ये खास राखीव जागांचा कोटा मिळणार असल्याचे जाहीर केले. सर्व मुंग्यांना “नाकतोडा दहशतवादविरोधी” कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून जबर दंड ठोठावण्यात आला. जबरदस्त दंडाबरोबरच मुंग्यांचे वारूळही सरकारने जप्त केले. नाकतोड़्यांना सर्व प्रकारचे कर माफ करण्यात येऊन, बिनव्याजी कर्ज देण्यात येईल असे सरकारने जाहीर केले. सर्व नाकतोड्यांना सरकारतर्फे नवीन घरे देण्यात आली आणि या शानदार सोहळ्याचे थेट प्रक्षेपण देशातील सर्व प्रसारमाध्यमांनी केले. अरुंधती रॉय आणि मेधा पाटकर यांनी याला “गगनभेदी विजय” असे संबोधले. माजी रेल्वेमंत्र्यांनी याला समाजवादाचा विजय असे संबोधले. कम्युनिस्टांनी याला “कष्टकऱ्यांचा” विजय असे म्हणून दर वर्षी हा दिवस “विजय दिवस” म्हणून साजरा करण्याचे जाहीरही केले. आपण एवढे कष्ट केले यात आपला कोणता गुन्हा झाला हे त्यांना शेवटपर्यंत कळले नाही आणि कोणाही बुद्धीजीवी, धर्मनिरपेक्ष, समाजवादी, पुरोगामी, विचारवंत, पुरस्कारवापसी ब्रिगेड, लेखक, पत्रकार, वृत्तपत्रांचे संपादक, स्तंभलेखक, स्फूटकार यापैकी त्यांना कोणीही हे सांगितले नाही. या अद्भूत प्रकाराने हैराण झालेल्या सर्वच मुंग्या थेट अमेरिकेमधील सिलिकॉन व्हॅली मध्ये गेल्या आणि आपल्या मेहनतीने, कष्टाने त्यांनी तेथे एक मल्टी बिलियन डॉलर्सची कंपनी स्थापन केली आणि त्यांनी तेथे अफाट प्रगती करून तेथील अनेकांनाही पोटापाण्याला लावले. मात्र आपल्या देशातील नाकतोडे कष्टकरी, मेहनती मुंग्यांना देशाबाहेर हाकलूनही विकसित-प्रगत-सुखी-समाधानी झाले नाहीत. एवढ्या सरकारी सवलती मिळूनही त्यांची परिस्थिती जशी होती तशीच आहे. अशा प्रकारे वर्षानुवर्षे होत गेल्यामुळे एवढ्या सवलती मिळूनही मेहनती, हुशार मुंग्यांपेक्षा गेली सत्तर वर्षे केवळ हौसमौज करणाऱ्या नाकतोड्यांचीच काळजी करत बसल्याने आपला देश अजुनही विकसनशील आहे. (ताज्या कल्पनेनुसार सर्व नाकतोड्यांनी आपण मुंग्यांच्या अन्यायाचे बळी असल्याबद्दल, सर्वच नाकतोड़्यांना, सरकारी खर्चाने अमेरिकेत पाठवून, मुंग्यांच्याच कंपनीत राखीव जागा निर्माण करून, आपल्या पोटापाण्याची सोय करून देण्याची मागणी सरकारकडे केल्याचे कळते. आणि या मागणीला नाकतोडा समर्थक पक्षांनी आणि संघटनांनी तसेच सर्व घटकांनी पाठिंबा दिल्याचीही माहिती आहे. खरे खोटे तेच जाणे !).

  (हे सर्व लेखन केवळ काल्पनिक आहे, सद्य परिस्थितीशी त्याचा काहीही संबंध नाही आणि असल्यास तो केवळ एक योगायोग समजावा) !

  शिवराम गोपाळ वैद्य
  डी-३०१, सुरभि श्री,
  निगडी, पुणे: ४११०४४
  मोबाइल: ९८५०५१८०१८