प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वजाचा अवमान

396

प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याप्रकरणी खोपोली नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा नूरजहां शेख आणि तत्कालीन मुख्याधिकारी नयन ससाणे यांच्यासह तीन अधिकाऱयांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश खालापूर न्यायालयाने दिले आहेत. हा प्रकार 26 जानेवारी 2011 रोजी घडला होता. नगराध्यक्ष आणि अधिकाऱयांना वाचविण्यासाठी प्रशासनाने राष्ट्रध्वजाच्या अवमानप्रकरणी मिस्तरी काम करणारा असिफखान पठाण याला जबाबदार धरले होते. मात्र न्यायालयाने पदाधिकारी आणि अधिकाऱयांना आरोपीच्या पिंजऱयात उभे केल्याने त्यांची पाचावर धारण बसली.

खोपोली नगरपालिकेमध्ये आठ वर्षांपूर्वी प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना ध्वजस्तंभाची पुल्ली निसटल्यामुळे राष्ट्रध्वज खाली पडला. त्यानंतर प्रशासनाने घाईघाईत ध्वजारोहण केले. मात्र त्यावेळी ध्वज उलटा फडकवला. याप्रकरणी प्रशासनाने मिस्तरी काम करणारा असिफखान याला जबाबदार धरल्याने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल होऊन त्याला अटकही झाली. सदर प्रकरणाची सुनावणी खालापूर न्यायालयात सुरू असताना सरकारी वकील सतीश नाईक यांनी जोरदार युक्तिवाद केला. राष्ट्रध्वजाच्या अवमानाला फक्त मिस्तरीच जबाबदार नाही तर पदाधिकारी आणि अधिकारी हेसुद्धा जबाबदार आहेत, हे नाईक यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर न्यायालयाने  माजी नगराध्यक्ष, तत्कालीन मुख्याधिकारी यांच्यासह कार्यालयीन अधीक्षक त्र्यंबक देशमुख, मुख्य अभियंता अशोक पाटील, महेश डफळ यांच्यावरही गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यामुळे नगरपालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या