दिल्लीत वीजेच्या कडकडाटासह पावसाची अचानक एन्ट्री

11

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

नवी दिल्ली एनसीआरमध्ये वीजेच्या कडकडासह पावसाने दमदार एन्ट्री केली आहे. यामुळे गेले काही दिवस उकाड्याने हैराण झालेल्या दिल्लीकरांना दिलासा मिळाला आहे. तसेच येत्या 48 तासात उत्तरेकडील राज्यांमध्ये देखील पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, वातावरणातील या बदलांचा पश्चिमेकडील किनारी पट्टीला फटका बसण्याची शक्यता आहे.

बुधवारी सकाळपासूनच दिल्ली व त्यालगतच्या राज्यांमधील हवामानात अचानक बदल झाला. सकाळी 7 च्या सुमारास वादळी वाऱ्यास सुरुवात झाली . त्यानंतर काही क्षणातच आकाशात काळे ढग जमा झाले आणि बघता बघता मध्य स्वरुपाच्या पावसाला सुरूवात झाली. पण तासाभराच्या आतच मध्यम स्वरुपाच्या पावसाने मुसळधार पावसाचे रुप धारण करत दिल्लीकरांची पुरती दाणादाण उडवली. यावेळी कामावर निघालेल्या दिल्लीकरांना पावसापासून बचाव करण्यासाठी आडोशाचा आधार घ्यावा लागला. तर येत्या काही तासात दिल्लीला लागून असलेल्या हरयाणा, हिसार, जींद, रोहतक, कॅथल, गोहना, पानीपत, करनाल, सोनीपत आणि गुरूग्राम येथेही हवामान बदलण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दुसरीकडे छत्तीसगढ, तेलंगणा, तमिळनाडू आणि पुद्दचेरी येथे अजून 4 ते 5 दिवस उकाडा कायम राहील.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार हिंदुस्थानातील महाद्विपांच्या उत्तरेकडील भागात येणाऱ्या वादळामुळेच उत्तर व पश्चिम हिंदुस्थानातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. यामुळेच मैदानी व डोंगराळ भागातील हवामानही बदलत आहे. याचा परिणाम राजस्थान पासून पंजाब, हरयाणा, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश, हिमाचल, उत्तराखंड आणि जम्मू-कश्मीरमध्येही बघायला मिळणार आहे.

हिमाचलमध्ये अनेक ठिकाणी बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच जम्मू-कश्मीरमधील अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या