मालमत्ताकरावरील शास्तीमध्ये 1 सप्टेंबर ते 28 सप्टेंबरपर्यंत शंभर टक्के सवलत देण्याचा निर्णय मनपा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. लोकअदालतमध्ये सहभागी होऊन थकबाकीदारांनी कर भरावा तसेच शास्तीवरील सवलत घेऊन मालमत्ता जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे.
नागरिकांना सर्व प्रभाग समिती कार्यालयात रोख पैसे भरण्यासाठी सुविधा आहे. मात्र, आता घरबसल्या मोबाईल ऍप, वेबसाईटद्वारे कर भरता येईल, या सुविधेचा लाभ घ्यावा, असेही आयुक्त डांगे यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व मनपाच्या वतीने 1 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर रोजी लोकअदालत होत आहे. यात थकबाकीदार मालमत्ताधारकांची प्रकरणे निकाली काढताना एकरकमी थकबाकी भरणाऱ्यांना शंभर टक्के शास्ती माफ केली जाणार आहे. त्यामुळे 1 सप्टेंबर ते 28 सप्टेंबरपर्यंत कर जमा करून नागरिकांनी या सवलतीचा लाभ घ्यावा.
रोख स्वरूपात करभरणा करण्यासाठी सावेडी, मध्यवर्ती शहर, झेंडीगेट, केडगाव-बुरुडगाव या चार प्रभाग समिती कार्यालय येथे व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच क्यूआर कोड, चेकद्वारे कराची रक्कम स्वीकारली जाणार आहे. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, गुगल-पे, फोन-पे, पेटीएम, व्हॉट्सऍप, भीम यूपीआय व इतर यूपीआयद्वारे कर भरण्याची सुविधा नगर महापालिकेने उपलब्ध करून दिली आहे.