ब्रह्मांडातही शिकार

नितीन फणसे

मोठ्या प्राण्यांकडून छोट्या प्राण्याची शिकार होणं हे काही नवीन नाही. पण एखाद्या छोट्याशा जीवाने अगडबंब प्राण्याची, तीही शांतपणे शिकार केल्याचं ऐकाल तर आश्चर्य वाटेल ना… अंतराळात नुकतीच अशीच एक घटना घडली. किमान सहा अब्ज वर्षे जुन्या, पण तुलनेने खूपच छोट्या व्हॅम्पायर ताराने एक मोठा तारा हळूहळू गिळंकृत केला. ‘ब्लू स्ट्रगलर’ असंही म्हटलं जाणाऱ्या या छोट्या ताऱ्याने त्याच्यातलं द्रव्य आणि त्याची ऊर्जा गट्टम केली. शिकारीची ही सगळी प्रक्रिया ‘अॅस्ट्रोसॅट’ या हिंदुस्थानच्या पहिल्याच अंतराळ वेधशाळा उपग्रहाने टिपली आणि त्याची छायाचित्रे पाठवली.

ब्रह्मांडात चाललेल्या हालचाली टिपण्यासाठीच हिंदुस्थानने ‘अॅस्ट्रोसॅट’ हा उपग्रह पीएसएलव्ही-सी ३० या रॉकेटच्या सहाय्याने अंतराळात सोडला आहे. या रॉकेटने ‘अॅस्ट्रोसॅट’सोबतच अन्य काही देशांचे आणखी सहा उपग्रहही अवकाशात धाडले आहेत. यात अमेरिकेच्या चार छोट्या उपग्रहांबरोबरच कॅनडा आणि इंडोनेशियाचाही प्रत्येकी एकेक उपग्रह सामील आहे. आपला उपग्रह तिकडे आपली कामगिरी चोख बजावतोय. त्याने पाठवलेल्या उच्च प्रतींच्या छायाचित्रांवरून संशोधक ब्लू स्ट्रगलर ताऱ्याची रासायनिक संरचना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे केवळ तो एकच तारा नव्हे, तर ब्रह्मांडातील इतर ग्रह, तारे यांचाही सखोल अभ्यास करता येणार आहे.

इस्रोने दिलेल्या माहितीनुसार ‘अॅस्ट्रोसॅट’वर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप, लार्ज एरिया एक्स रे प्रपोशनल काऊंटर, सॉफ्ट एक्स रे टेलिस्कोप, कॅडमियम झिंक टेल्युराइड इमेजर आणि स्कॅनिंग स्काय मॉनिटर ही पाच मुख्य उपकरणं बसवण्यात आली आहेत. या उपकरणांपासून मिळालेली माहिती, आकडेवारी पृथ्वीवरच्या ‘मिशन ऑपरेशन्स कॉम्पलेक्स’कडे (मॉक्स) पाठवली जाते. हा उपग्रह अल्ट्रावायोलेट, ऑप्टिकल आणि लो एंड हाय एनर्जी एक्स-रे वेवबॅण्डच्या सहाय्याने एकाचवेळी ब्रह्मांडावर लक्ष ठेवू शकतो. अंतराळात कुठेही खुट झालं तरी त्याची दखल हा उपग्रह घेऊ शकतो. त्याचं वजन १५१३ किलो असून पृथ्वीच्या वातावरणातच तो स्थिर करण्यात आला आहे.

जगाला होणार फायदा

ब्रह्मांडात अशा प्रकारची शिकार होणं ही सामान्य बाब असल्याचं हिंदुस्थानी खगोल भौतिकी संस्थेच्या प्राध्यापिका अन्नपूर्णा सुब्रह्मण्यम सांगतात. यात एखादा छोटा तारा आपल्या जवळच्या मोठय़ा ताऱयावरील द्रव्य आणि ऊर्जा शोषून घेत मोठा ब्लू स्ट्रगलर तारा बनतो. म्हणून त्याला ‘व्हॅम्पायर’ ताराही म्हटलं जातं. या शिकारीनंतर छोटा तारा पहिल्यापेक्षा अधिक मोठा, गरम आणि जास्त निळा बनतो. यामुळे तो कमी वयाचा असल्यासारखं वाटतं. ही शिकार पहिल्यांदाच घडलीय असं नाही. अशा प्रकारच्या शिकारीबद्दल यापूर्वीही प्रसिद्ध झालं होतं. पण आता त्याची सलग छायाचित्रे ‘अॅस्ट्रोसॅट’ने उपलब्ध करून दिल्यामुळे ब्लू स्ट्रगलर ताऱयांच्या अभ्यासाला गती येईल असेही त्यांनी स्पष्ट केलं. जगभरातल्या संशोधकांना या माहितीचा, या छायाचित्रांचा फायदा होणार आहे.