डोक्यात हातोड्याने वार करून अल्पवयीन मुलाकडून तरुणाची निर्घृण हत्या

27

सामना ऑनलाईन । न्हावाशेवा

डोक्यात हातोड्याने वार करून एका अल्पवयीन मुलाकडून २२ वर्षीय तरूणाची निर्घृण हत्या करण्याची घटना उरण तालुक्यातील जासई गावात घडली आहे. या प्रकरणी उरण पोलिसांनी आरोपी उपेंद्र कुमार (१४) या अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. गुलाबचंद महतो (२२) असे या हत्येत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव असून तो मूळचा झारखंड येथील आहे.

खून करणारा अल्पवयीन मुलगा आणि गुलाबचंद महतो दोघेही मित्र होते. ते जासई येथे भाड्याच्या खोलीत राहत होते. उपेंद्र एका गॅरेजमध्ये तर गुलाबचंद महतो हा एका डंपरवर ड्रायव्हर म्हणून काम करत होता. काही दिवसांपूर्वी गुलाबचंद महतो आणि उपेंद्र कुमार यांच्यात झालेल्या भांडणात गुलाबचंदने उपेंद्रला मारले होते. त्यावेळेला उपेंद्र कुमारच्या डोक्यावर जखम झाली होती.

या मारामारीचा बदला घेण्याचे ठरवत शुक्रवारी दुपारी गुलाबचंद महतो आपल्या खोलीत झोपला असताना उपेंद्र कुमारने लोखंडी हातोड्याने गुलाबचंदच्या डोक्यात १०-१५ घाव घालून त्याचा खून केला. यानंतर उपेंद्र कुमार येथून पळून गेला. ही घटना शेजारील एका टेलरला समजल्यानंतर त्यांनी याबाबत उरण पोलीस ठाण्यात माहिती दिली. उरण पोलिसांनी तपास करून आरोपी उपेंद्र कुमार याला अटक केली. शनिवारी आरोपीला कर्जत येथील बाल न्यायालयात हजर केले असून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. या बाबत उरण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या