क्षुल्लक वादातून पती-पत्नीची आत्महत्या, ज्याच्यासाठी भांडले ‘तो’ चिमुरडा झाला पोरका

4122

लातूर तालुक्यातील मौजे भातांगळी येथे लहान मुलाच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये झालेला वाद टोकाला गेला. रागाच्या भरात पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली, तर पतीने विष पिऊन आपली जीवनयात्रा संपवली. ज्याच्यासाठी वाद झाला तो 3 वर्षांचा चिमुरडा मात्र पोरका झाला.

चंद्रपूर जिल्ह्यातील राम गुणाजी नरवटे व त्याची पत्नी शालुबाई नरवटे हे लातूर तालुक्यातील मोजे भातांगळी येथे सालगडी म्हणून कामाला होते. त्यांना 3 वर्षांचा एक मुलगा असून राम नरवटे यांनी रागाच्या भरामध्ये मुलाला एक चापट मारली. त्यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. हा वाद एवढा टोकाला गेला की शालुबाई यांनी घरात गळफास लावून आत्महत्या केली.

पत्नीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे पाहून राम नरोटे यांनी विषारी औषध पिऊन आपले जीवन संपवले. लातुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयांमध्ये दोघांनाही मृत घोषित करण्यात आले. दोघा पती-पत्नीच्या टोकाच्या वादात त्यांचा तीन वर्षाचा मुलगा मात्र आई-वडिलांच्या सुखाला पोरका झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या