मला माझ्या बायकोपासून वाचवा; कराटे चॅम्पिअन महिलेच्या नवऱ्याची मागणी

प्रेम आंधळं असतं, असे म्हणतात. मात्र, प्रेम वेडंही असतं याचा प्रत्यय दिल्ली एनसीआरच्या नोयडामधील एका युवकाला आला. त्याला त्याच्या प्रेमामुळे स्वतःचे हातपाय मोडून घेण्याची वेळ आली आहे. आता त्याने मदतीसाठी थेट पोलिसांनाच विनंती केली आहे.

दीपक साहनी नावाच्या युवकाची सोशल मीडियावरून एका कराटे चॅम्पिअन मुलीशी ओळख झाली. त्यांची मैत्री झाली. मुलीचा आक्रमकपणा आणि कराटेचे कौशल्य यावर दीपक फिदा झाला. त्याने तिच्याशी मैत्री वाढवली. त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यांनी लग्नही केले. मात्र, ज्या आक्रमकपणा आणि कराटेच्या कौशल्यावर दीपक भाळला होता, तेच कौशल्य आपल्या जीवावर बेतेल याची कल्पनाही दीपकला नव्हती.

दीपकला रविवारी सकाळी त्याचे वडील अशोक साहनी व्हीलचेअरवर जिल्हा रुग्णालयात घेऊन आले. त्याचा एक पाय फ्रॅक्चर झाला होता आणि शरीरावर ठिकठिकाणी रक्त साकळले होते. याबाबत घडलेल्या घडनेची माहिती त्याने दिल्यानंतर डॉक्टर आणि पोलीसही अवाक् झाले. आमचे लग्न झाल्यानंतर काही महिने आनंदात गेले. आम्ही संसारात रमलो होतो. मात्र, जीवनात अचानक बदल झाला. माझ्यात आणि बायकोमध्ये खटके उडायला लागले. वादावादी सुरू झाल्यानंतर बायको तोंडाने संवाद साधण्याऐवजी हातापायांचा उपयोग करू लागली. कराटेमध्ये शिकलेले प्रकार ती माझ्यावर आजमावू लागली. त्यामुळे मार खाऊन अनेकदा आपल्याला माघार घ्यावी लागल्याचे दीपकने सांगितले.

शनिवारीही दोघांमध्ये असेच भांडण झाले. कोणीही माघार घेण्यास तयार नव्हते. त्यातच दीपकच्या बायकोचा पारा चढला आणि तिने आक्रमक पवित्रा घेत कराटेच्या ट्रिक्सचा वापर करत दीपकला बदडायला सुरुवात केली. त्यात दीपकचा पाय फ्रॅक्चर झाला असून त्याची अर्धमेली अवस्था झाली होती. तसेच शरीरात ठिकठिकाणी रक्त साकळले होते. तिचा राग शांत होईपर्यंत ती आपल्याला मनसोक्त बदडत होती. रविवारी सकाळी कशीबशी तिच्या तावडीतून सुटका करून घेतली, असे दीपकने सांगितले. तशाच अवस्थेत त्याच्या वडिलांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मला माझ्या कराटे चॅम्पिअन बायकोपासून वाचवा, अशी मागणी दीपकने आता पोलिसांकडे केली आहे.

कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण होण्यासाठी सरकारने कायदा केला आहे. मात्र, पुरुषांच्या सुरक्षेसाठी कोणताही कायदा नाही. पुरूष आयोग स्थापन करण्याची मागणी होत आहे. आता दीपकसोबत झालेल्या घटनेनंतर ही मागणी जोर धरत आहे. दीपक आणि त्याच्या बायकोमध्ये भांडणे झाल्यानंतर ती नेहमी त्याला बदडून काढायची, असे दीपकच्या वडिलांनी सांगितले. ज्यूडो कराटेमध्ये शिकवण्यात आलेल्या ट्रिक्स ती दीपकवर वापरायची. दीपकने प्रतिहल्ला करणे दूरच, त्याला प्रतिकार आणि स्वतःचा बचाव करण्याची संधीही मिळत नव्हती, असे त्याचे वडील म्हणाले.

याआधी तिने अनेकदा दीपकला जखमी केले आहे. त्याच्या डोक्यात फ्रॅक्चर झाले होते. त्याचा इलाज अजूनही सुरू आहे. याबाबत आम्ही पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल केली असल्याची माहितीही अशोक साहनी यांनी दिली आहे. याबाबतची तक्रार आमच्याकडे दाखल झाली असून तपास करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या