नवरा स्त्रीप्रमाणे नटतो, संबंधही ठेवत नाही, पत्नीची न्यायासाठी कोर्टात धाव

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये पती-पत्नीमधील वादाचे एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. इंदूरमधील एका व्यक्तीवर त्याच्या पत्नीने गंभीर आरोप केले आहेत. पत्नीच्या म्हणण्यानुसार तिचा पती संध्याकाळच्या वेळी स्त्रीसारखे कपडे घालून नटतो आणि रात्री झोपायच्या वेळेस पती दुसऱ्या खोलीत झोपायला जातो. तसेच तो तिच्याशी संबंध ठेवत नाही. पतीच्या या अशा वागण्यामुळे पत्नी त्रासली आणि तिने न्यायासाठी थेट कोर्टात धाव घेतली.

महिलेचा पती हा व्यवसायाने इंजिनिअर आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार, तिचा पती रात्री झोपण्यापूर्वी महिलांप्रमाणे मेकअप करतो आणि तिच्याशी प्रेमही करत नाही. यामुळे महिलेने न्यायासाठी जिल्हा न्यायालयात दाद मागितली, त्यावर न्यायालयाने सुनावणी करताना पीडित पत्नीला भत्ता देण्याचे आदेश पतीला दिले आहेत.

इंदूर येथील महिलेचा विवाह आरोपीसोबत 29 एप्रिल 2018 रोजी झाला होता. महिलेच्या म्हणण्यानुसार, तिच्या सासरच्या लोकांनी तिला काही दिवस चांगले ठेवले, त्यानंतर पतीसह सासरच्या लोकांनी तिला छोट्या-छोट्या गोष्टींवरून टोमणे मारण्यास सुरुवात केली. महिलेच्या म्हणण्यानुसार, आरोपी आणि त्याचे कुटुंबीय तिच्याकडे दैनंदिन खर्चासाठी पैशांची मागणी करायचे आणि जर ते दिले नाही तर तिला वेगळ्या खोलीत बंद करायचे. पीडित महिलेच्या वकिलाने सांगितले की, आरोपी पती हा पत्नीला इंदूरहून पुण्याला घेऊन गेला आणि तिथे तिचा छळ करायचा.

वकिलाने सांगितले की, आरोपी पती पत्नीशी संबंध ठेवत नव्हता आणि तो सर्व खर्च पत्नीकडून घेत असे. आणि विचित्र बाब म्हणजे तो कपाळावर टिकली, ओठावर लिपस्टिक आणि कानात झुमके लावून महिलेचा मानसिक छळ करत असे. तसेच तो स्त्रीच्या वेशात फोटो काढून व्हिडिओही बनवत असे.

पीडित महिलेने पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केली, ज्यामध्ये तिने आरोप केला होता की पतीने तिच्याशी वैवाहिक संबंध ठेवले नाहीत आणि तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. यानंतर जिल्हा न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून त्याची कारागृहात रवानगी केली. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर पतीने पीडित पत्नीला दरमहा 30 हजार रुपये भत्ता द्यावा, असे आदेश दिले.