राष्ट्रीय नेमबाजावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी पतीकडून दबाव

32
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
राष्ट्रीय पातळीवरच्या नेमबाज तारा सहदेव (२३) यांच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी पती दबाव आणत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सीबीआयने तारा यांचे पती रणजित सिंह कोहली उर्फ रकीबुल हसन यांच्यावर जबरदस्तीने धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे.
या आरोपपत्रात कोहली याच्यावर हुंडयासाठी पत्नीचा छळ करणे, बलात्कार करणे असेही आरोप नमूद करण्यात आले आहेत. तसेच तारा यांची सासू कौशल रानी आणि झारखंड उच्च न्यायालयाचे रजिस्टार मुश्ताक अहमद यांच्याविरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. रांची येथील विशेष न्यायालयात हे आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. एक जून पासून याप्रकरणाची सुनावणी सुरू होणार आहे.
तारा यांचा विवाह ७ जुलै २०१४ रोजी कोहली यांच्याबरोबर झाला. लग्नानंतरचे सुरुवातीचे दिवस आनंदात गेले. पण नंतर कोहली मुसलमान असल्याचे समजले आणि आपल्याला मोठा धक्काच बसल्याचे तारा यांनी म्हटले आहे. कोहली याने स्वतःचा धर्म लपवला व माझी फसवणूक केली. त्यानंतर कोहली व त्याच्या आईने माझ्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणला व माझा मानसिक व शारीरिक छळ सुरू केल्याचा आरोप तारा यांनी केला आहे. कोहलीला धर्म बदलण्याचा सल्ला एका मांत्रिकाने दिला होता. त्यानंतर २००७ मध्ये त्याने इस्लाम धर्म स्वीकारला. अशी माहिती सीबीआयने दिली आहे.
आपली प्रतिक्रिया द्या