साताऱ्य़ात व्यसनी पत्नीचा पतीनेच केला खून

सातारा तालुक्यातील नागठाणे येथे एका महिलेचा खून झाल्याचे निदर्शनास आल्याने गावात खळबळ उडाली. दरम्यान, बोरगाव पोलिसांनी अवघ्या सहा तासांत हा गुन्हा उघडकीस आणला. संबंधित महिलेला असलेल्या दारूच्या व्यसनामुळे चिडून तिच्या पतीनेच हा खून केल्याचे निष्पन्न झाले असून, त्याला अटक करण्यात आली आहे.

मालन बबन गायकवाड (वय 55) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून, तिचा नवरा बबन बाबूराव गायकवाड (वय 60) याला अटक करण्यात आली आहे.

नागठाणे येथील जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेसमोर असलेल्या चाळीतील एका खोलीत हा खून झाल्याचे मंगळवारी सकाळी निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच बोरगावचे सहायक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबकर यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. सहायक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनीही घटनास्थळी भेट दिली.

त्यानंतर जिल्हा पोलीसप्रमुख अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सागर वाघ, वर्षा डाळिंबकर व त्यांच्या पथकाने घटनास्थळावरील परिस्थितीची पाहणी करून व आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली असता, मृत मालन बबन गायकवाड व तिचा नवरा बबन बाबूराव गायकवाड (वय 60) यांच्यात सतत भांडण होत असल्याचे समजले. याबाबत बबन गायकवाड याच्याकडे तपास केला असता, त्याने खुनाची कबुली दिली. पत्नी मालनला दारूचे व्यसन होते. ते मला आवडत नव्हते. काल रात्री ती दारू प्यायल्याने आमच्यात जोरात भांडण झाले. त्यावेळी मी तिला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचे त्याने सांगितले. या गुन्ह्यात त्याला जेरबंद करण्यात आले आहे.

पत्र्याच्या पेटीत सापडल्या देशी दारूच्या 300 बाटल्या

या गुन्ह्याच्या अनुषंगाने घटनास्थळाची पाहणी करीत असताना, घरामध्ये पत्र्याच्या पेटीत ‘मनोरंजन संत्रा’ नावाचे लेबल असलेल्या 90 मिलीच्या 300 दारूच्या बाटल्या सापडल्या. या दारूच्या बाटल्यांबाबत आरोपी बबन बाबूराव गायकवाड याच्याकडे तपास केला असता, त्याने या दारूच्या बाटल्या अविनाश अरविंद साळुंखे (रा. नागठाणे) याने घरात ठेवल्या असल्याचे सांगितले. त्याबाबत अविनाश अरविंद साळुंखे याच्यावर स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.

आपली प्रतिक्रिया द्या