रक्ताने माखलेल्या आईच्या मृतदेहाला बिलगून तीन चिमुकल्यांचा रात्रभर टाहो

1936

रक्ताने माखलेली… जमिनीवर निपचित पडलेली आई… ती अशी का झोपली… ती का उठत नाही, आई उठ ना… असा रात्रभर टाहो फोडत तिच्या मृतदेहाला बिलगलेल्या तीन चिमुकल्या मुली…. अंगावर काटा आणणारे आणि हृदय पिळवटून टाकणारे हे दृश्य… रेल्वेखाली आत्महत्या केलेल्या एका इसमाचा शोध घेण्यासाठी उरणच्या जसई गावात पोलीस पोहोचले तेव्हा त्याच्या घरातील हा भयंकर प्रकार पाहून सर्वांचेच मन हेलावले.

मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पोलिसांना जासई रांजणपाडा येथे एका इसमाने रेल्वेखाली आत्महत्या केली असल्याचा फोन आला होता. पोलिसांनी ताबडतोब तिथे जाऊन शव ताब्यात घेतले.  राजकुमार राय (31) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव असून त्याच्याकडील मिळालेल्या पत्त्यावरून तपास करताना बुधवारी त्याच्या घरी गेले असता घराला कुलूप असल्याचे दिसले. पोलिसांनी घराचे कुलूप तोडले तेव्हा त्यांना हृदय पिळवटून टाकणारे दृश्य दिसले. घरात त्याची पत्नी किरण ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती.   एक वर्षाची एक तर चार आणि पाच वय असलेल्या तिच्या तीन लहान मुली तिच्या अंगावर बिलगून निजल्या होत्या. किरणची गळा चिरून हत्या झाली असल्याचे पोलिसांना प्रथम दर्शनी दिसले. तिची हत्या करून राजकुमारने रेल्वेखाली आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र या घटनेमुळे आईबापाचे छत्र कायमचे हरपलेल्या त्या तीन मुली अनाथ झाल्या आहेत.

चारित्र्याच्या संशय

राजकुमार आणि किरण राय हे दोघे मूळचे बिहारचे रहिवासी होती. येथील टीआयपीएल कंपनीत सुपरवायझरचे काम करणाऱ्या राजकुमारने 20 दिवसांपूर्वीच पत्नी किरण आणि आपल्या तीन मुलींना गावावरून आणले होते. पण या दोघांमध्ये खटके उडू लागले. राजकुमारचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यातूनच त्याने पत्नीची हत्या करून आत्महत्या केली असल्याचा  प्राथमिक अंदाज असल्याचे उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदिश कुलकर्णी यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या