दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पतीने केला पत्नीचा खून

39

सामना प्रतिनिधी । हिंगोली

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वसमत तालुक्यातील हयातनगर येथील हा प्रकार आहे. वंदना अंभोरे (२५) असं मृत महिलेचं नाव आहे. शनिवारी (१० मार्च) रात्रीची ही घटना असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हयातनगर येथील वंदना हिचा विवाह १० वर्षापूर्वी नांदेडमधील बोरगाव येथील बळीराम अंभोरे याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही वर्षांनी वंदना पती बळीरामसोबत हयातनगर येथे राहण्यास आली होती. बळीराम हा नेहमी दारू पिऊन वंदनास त्रास देत असल्याचा आरोप वंदनाच्या नातेवाईकानी केला आहे. बळीरामने शनिवारी रात्री अकराच्या सुमारास वंदना हिच्या अंगावरील कानातले फुले, पायातील जोडवे, गळ्यातील पोत हे सर्व सोने-चांदीचे दागिने काढून घेतले. त्यानंतर त्याने वंदनाचा गळा दाबून खून केल्याचा संशय नातेवाईकानी व्यक्त केला आहे.

रविवारी सकाळी वंदना झोपेतून कशी उठली नाही म्हणुन नातेवाईकांनी तिला आवाज दिला. मात्र काहीच प्रतिसाद मिळाला नाही म्हणून नातेवाईकानी दार उघडले तर आत वंदना मृतावस्थेत दिसली. त्यानंतर नातेवाईकांनी याबबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी वंदना हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी वंदनाचा पती बळीराम अंभोरे याच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. वंदनाला सात वर्षाची मुलगी असून ती इयत्ता पहिलीमध्ये शिकत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या