
जल जीवन मिशनअंतर्गत तीन गावांमध्ये सौर उर्जेंवर आधारित दुहेरी पंप लघुनळ योजनेच्या सुरू असलेल्या कामांना अडवून ती पुन्हा सुरू करण्यासाठी दीड लाख रुपये लाचेची मागणी केली. मात्र, एक लाख रुपयांवर तडजोड करून लाचेची रक्कम स्वीकारणारा सरपंच पती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला असून, त्यास पोलिसांनी जेरबंद केले आहे.
परंडा तालुक्यातील रोहकलसह इतर 2 वस्तीवर ‘मेनकर एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीची जल जीवन मिशनअंतर्गत सौर उर्जेवर आधारित दुहेरी पंप लघुनळ योजनेचे 18 लाख रुपये किमतीची कामे सुरू आहेत. मात्र रोहकल येथील सरपंच महिलेचे पती हनुमंत पांडुरंग कोलते (43) यांनी ती कामे बंद केली होती. तसेच या कंपनीमध्ये साईट सुपरवायझर म्हणून कार्यरत असलेल्या एका 35 वर्षीय कर्मचार्याकडे तुम्ही 3 गावांमधील सुरू असलेल्या कामांचे प्रत्येकी 50 हजार रुपये याप्रमाणे दीड लाख रुपये किंवा सोलरच्या 3 प्लेटा व त्याचे साहित्यासाठी लाचेची मागणी केली. तडजोडी अंती 22 मार्च रोजी 1 लाख रुपये लाच घेण्याचे मान्य करून ती लाच आज 23 मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या आवारात असलेल्या कॅन्टीनमध्ये पंचासमक्ष स्वीकारली. लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी सरपंच पती हनुमंत कोलते यास रंगेहात पकडून त्याची उचल बांगडी केली आहे. या प्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांनी सापळा रचून यशस्वी केली. या सापळा पथकामध्ये पोलीस अंमलदार दिनकर उगलमुगले, इफ्तेकार शेख, सचिन शेवाळे, विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावसकर यांचा समावेश आहे.