पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्यामुळे दोन मुलांची हत्या करून पतीची आत्महत्या

1204

पती आणि पत्नी हे अतूट नाते असते. एकाने साथ सोडली तर दुसऱ्याचे जगणे कठीण होते. याचा प्रत्यय चेंबूरमधील एका घटनेतून आला. मुंबईच्या चेंबूरमधील कस्तुरबा नगर  भागात राहणाऱ्या दिनेश यादव याची पत्नी प्रियकरासोबत पळून गेली. त्यामुळे निराश झालेल्या दिनेशने आपल्या दोन मुलांची हत्या करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे चेंबुर येथे खळबळ उडाली आहे.

दिनेशच्या भावाने रविवारी सकाळी दरवाजा ठोकवला. मात्र, दरवाजा उघडला नाही म्हणून त्यांने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला. त्यानंतर आतील दृश्य बघून त्याला धक्का बसला. दोन्ही मुले खाली मृतावस्थेत पडली होती. तर दिनेशने पंख्याला गळफास घेतला होता. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. दिनेशचा गळाफासाने मृत्यू झाला आहे. तर एक आणि तीन वर्षांच्या मुलांचा कसा मृत्यू झाला ते समजू शकलेले नाही.

दिनेशची पत्नी याआधीही दोनदा प्रियकरासोबत पळून गेली होती. मात्र, त्यावेळी दिनेशने तिला समजावून पुन्हा घरी आणले होते. यावेळी शनिवारी रात्री पत्नी कधी आणि कुठे घर सोडून गेली हे त्याला कळले नाही. पत्नी सोडून गेल्यामुळे तो निराश झाला होता आणि खचला होता. या नैराश्यातूनच त्याने एक आणि तीन वर्षांच्या मुलांची हत्या करून गळफास घेत स्वतःचेही जीवन संपवले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. पोलीस दिनेशच्या बायकोचा आणि तिच्या प्रियकराचा शोध घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या