7 वर्षांची मुलगी पोलीस ठाण्यात गेली, तिने जे सांगितलं ते ऐकून पोलीसही हादरले

प्रातिनिधीक फोटो

28 मे रोजी सकाळी एक 7 वर्षांची मुलगी पोलीस ठाण्यात गेली. पोलिसांसमोर ती उभी राहिली आणि तिने जे सांगितलं ते ऐकल्यानंतर पोलीसही हादरून गेले. मुलीने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी ताबडतोब कारवाईला सुरुवात केली आणि तिने जे काही सांगितलं होतं ते खरं निघाल्याचे पोलिसांनी सांगितले.

आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यामध्ये गोटलापालेम नावाचे गाव आहे. इथे सुभाषिनी तिच्या नवऱ्यासोबत म्हणजेच बुडबुक्कलासोबत राहात होती. 27 तारखेला हे दोघेजदण बेफाम दारू प्यायले. काही कारणावरून दोघांमध्ये वाद पेटला आणि भांडणाला सुरुवात झाली. रागाच्या भरात बुडबुक्कलाने सुभाषिनीला मारायला सुरुवात केली. मारहाणीमुळे सुभाषिनी बेशुद्ध पडली.

सुभाषिनी बेशुद्ध पडल्याचे पाहिल्यानंतर बुडबुक्कलाने घराजवळच एक खड्डा खणला. सुभाषिनी जिवंत होती मात्र बेशुद्ध होती. बुडबुक्कलाने तिला उचललं आणि खड्ड्य़ात नेऊन पुरलं. हे सगळं त्यांची सात वर्षांची मुलगी पाहात होती. बुडबुक्कलाने हे कोणाला सांगितलंस तर याद राख असं सांगून तिला धमकावलं आणि पळून गेला. आई गेली, बाप फरार झाला आता करायचं काय असा या लहान मुलीसमोर प्रश्न उभा राहिला. तिने सगळी हिम्मत एकवटली आणि पोलीस ठाणे गाठले. तिने घटना पोलिसांना सविस्तर पद्धतीने सांगितली. पोलिसांनी तातडीने सुभाषिनीला पुरलं होतं ते ठिकाण शोधून तिचा मृतदेह बाहेर काढला. बुडबुक्कला फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या