कानडी पोलिसांची दंडेलशाही, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादनासाठी गेलेल्या राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना रोखले

संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी शांततेच्या मार्गाने मराठी भाषिक चळवळीचे प्रमुख केंद्र असलेल्या बेळगावमध्ये दाखल होत असताना आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना यावर्षीही कानडी पोलिसांनी रोखल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

गेल्यावर्षी कानडी पोलिसांच्या नाकावर टिच्चून मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे बेळगावमध्ये एकटेच दाखल झाले होते. याची कुणकुण लागताच कानडी पोलिसांनी हुतात्म्यांना अभिवादन करताना अटकाव केल्याने त्यांचे सीमाभागासह महाराष्ट्रातही संतप्त पडसाद उमटले होते.
आज सकाळी मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे जयसिंगपूर येथुन बेळगाव ला सीमाप्रश्नासाठी धारातीर्थी पडलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी निघाले असता पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी टोल नाक्यावरच प्रचंड फौजफाट्यात कानडी पोलिसांकडुन त्यांना बेळगावात जाण्यास अटकाव करण्यात आला.

महाराष्ट्रातील कोणीही बेळगावला अभिवादनास येऊ नये म्हणून कालपासूनच कोगनोळी टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच वाहनांची कडक तपासणी सुरू होती. त्यामुळे मंत्री यड्रावकर टोल नाक्यावर पोहचताच त्यांची अडवणूक करण्यात आली. अशी अडवणूक करता येत नसल्याचे सांगुन सुद्धा कानडी पोलिसांनी बेळगावकडे न सोडण्याची भुमिका ठेवल्याने यावेळी वादावादी आणि गोंधळ निर्माण झाला. कर्नाटक सरकार च्या निषेधार्थ टोलनाक्यावरच बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, कर्नाटक पोलिसांचा धिक्कार असो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला.

सीमा चळवळीतील हुतात्म्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही!

बेळगांव, निपाणी, बिदर, भालकीसह ८६५ मराठी भाषिक गावे जोपर्यंत महाराष्ट्रात येत नाहीत. तोपर्यंत संयुक्त महाराष्ट्र पूर्ण होणार नाही. त्यामुळे कर्नाटक सरकारने लोकशाहीचा गळा कितीही घोटला तरी महाराष्ट्र सरकार शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली सदैव सीमाबांधवा सोबतच राहिल. हुतात्म्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही,अशी ग्वाही आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दैनिक सामनाशी बोलताना दिली.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेद्वारे या देशातील नागरिकांना सर्वत्र संचार करण्याचा, शांततेने सत्याग्रह करण्याचा अधिकार दिला आहे. पण कर्नाटक सरकारकडुन प्रत्येकवेळी मराठी भाषिकांवर दडपशाही करून या राज्यघटनेला हरताळ पाळण्यात येत असल्याने त्याचाही तीव्र शब्दांत मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी निषेध व्यक्त केला. तसेच देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या मराठी भाषिकांच्या शिष्टमंडळाची भेटीची विनंती नाकारल्याने,त्यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या