पाच वर्षांपूर्वी म्हणजेच 2019 मध्ये जगाचे लक्ष वेधून घेतलेला व्हाल्दिमिर नावाचा बेलुगा व्हेल मृतावस्थेत आढळून आला आहे. त्याच्या मृत्यूमुळे संशय व्यक्त करण्यात येत आहे.
एका अहवालानुसार, 14 फूट लांब आणि 2.700 पाऊंड व्हेल पाच वर्षांपूर्वी कॅमेऱ्यासाठी डिझाइन केलेल्या हार्नेसह दिसली होती. व्हेलच्या हार्नेसवर सेंट पीटर्सबर्गचे उपकर लावलेले होते. त्यामुळे नॉर्वेजियन शब्द ‘व्हल’ आणि रशियन शब्द व्लादिमीर यावरून तिला Hvaldimir the Spy असे टोपणनाव देण्यात आले होते.
बेलुगा व्हेल कदाचित रशियन मोहिमेचा भाग असावी असा अंदाज बांधण्यात येत होता. मात्र रशियाकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती न मिळाल्याने व्हेलचा उपयोग हेरगिरी करण्याकरीता तर केला जात नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
बेलुगा व्हेल हे सामान्यत: दुर्गम आणि थंड आर्क्टिक प्रदेशात आढळून येतात. मात्र हा व्हेल मानवाभोवती सहजतेने वावरत असल्याचे दिसले. यावरून व्हेल त्याच्या आयुष्यातील बराच काळ मानवी सहवासात राहिला असल्याचा संशय तज्ञांनी व्यक्त केला होता.
गेल्यावर्षी नॉर्वे येथील ओस्लोफजोर्डमध्ये व्हेल आढळला होता. त्यानंतर नॉर्वे सरकारने व्हेलला सुरक्षित ठेवण्याकरीता फरमान काढले होते. मानवी वस्तीत आल्याने व्हेलला इजा होण्याचा धोका वाढला होता, त्यामुळे नॉर्वेजियन डायरेक्टरेट ऑफ फिशरीजने निवेदन दिले होते.