हैदराबाद एक्सप्रेसचे इंजिन घसरल्याने मुंबई-पुणे वाहतूक विस्कळीत

24

सामना प्रतिनिधी। पुणे

खंडाळा घाटात मध्य रेल्वेच्या मिडल लाईनवर दरड कोसळल्याने खाली आलेल्या दगडांमुळे या लाईनने हैदराबाद कडे निघालेल्या मुंबई हैदराबाद एक्सप्रेसचे इंजिन रुळावरून खाली उतरले. सुदैवाने या अपघातात मोठी जीवितहानी टळली आहे.

मंगळवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या दरम्यान खंडाळा घाटात रेल्वेच्या मिडल लाईनवर स्टेशन ठाकूरवाडी ते मंकीहील दरम्यान सदर घटना घडली. मुंबई हैदराबाद एक्सप्रेस कर्जत स्टेशनच्या पुढे असलेले स्टेशन ठाकूरवाडी सोडल्यावर एक बोगदा पार करीत असताना अचानक वरून आलेल्या दगडांमुळे एक्सप्रेसचे इंजिन रुळावरून खाली उतरले. ही घटना घडली तेव्हा या एक्सप्रेसचे इंजिन आणि तीन डबे बोगद्यामधून बाहेर होते तर उर्वरित सर्व डबे बोगद्यातच होते. बाहेर आलेल्या डब्याच्या खाली तसेच दोन डब्यांच्या मधल्या भागात अनेक मोठमोठे दगड अडकले होते. कोसळलेली दरड, वरून पडत असलेला मुसळधार पाऊस, सर्वत्र पसरलेले दाट धुके यामुळे या गाडीने प्रवास करणारे प्रवासी घाबरून गेले होते.

ही घटना समजताच रेल्वेचे बचाव पथक घटनास्थळी पोचेल आणि बचावकार्य सुरू केले. यात रेल्वे प्रवाशांनीही मदत केली. ट्रेन खाली घुसलेले दगड तसेच पुढे रेल्वे लाईनवर पडलेले मोठमोठे दगड बाजूला करण्यात गाडीतील प्रवाशांनी रेल्वे बचाव पथकाला मोठी मदत केली. शेवटी संध्याकाळी ६ वाजता कर्जत स्टेशन वरून एक इंजिन पाठवून अपघातग्रस्त एक्सप्रेसचे रेल्वे इंजिन आणि पाहिले तीन डबे घटनास्थळी ठेऊन त्यातले प्रवासी इतर डब्यामध्ये ऍडजस्ट करीत ही एक्सप्रेस पुन्हा कर्जत येथे आणण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या