बलात्कार आरोपीचा मृतदेह आढळला रेल्वे रुळावर, एन्काऊंटरमध्ये मारण्याची मंत्र्याने दिली होती धमकी

हैद्राबादमध्ये एका सहा वर्षीय मुलीचा बलात्कार आणि खून केलेल्या आरोपीचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळला आहे. तेलंगाणा पोलिसांनी  ट्विट करून ही  माहिती दिली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी एका मंत्र्याने आरोपीला एन्काऊंटरमध्ये ठार करू अशी धमकी दिली होती.

9 सप्टेंबर रोजी हैद्राबादमध्ये एका 6 वर्षाच्या मुलीचा बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता. पल्लाकोंडा राजू या 30 वर्षीय तरुणाच्या घरात पीडित मुलीचा मृतदेह आढळला होता. घटनेनंतर आरोपी राजू फरार झाला होता. पीडित मुलीचे शवविच्छेद झाल्यानंतर नंतर तिच्यावर बलात्कार करून खून झाल्याचे निष्पण्ण झाले.


पोलिसांनी तत्काळ आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली. तसेच आरोपीचा शोध घेणार्‍यास 10 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते.  आधी आरोपीला पकडण्यात आल्याचे  वृत्त प्रसारित झाले होते. परंतु हे वृत्त खोटे असल्याचे समोर आले. त्यानंतर मंत्री मल्ला रेड्डी यांनी आरोपीला पकडून त्याला एन्काऊंटरमध्ये ठार केले जाईल असे विधान केले होते.

2019 साली हैद्राबादमध्ये एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिला जिवंत जाळण्यात आले होते.  नंतर आरोपींचा एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला होता.

अखेर आज हैद्राबादपासून 130 किमी दूर रेल्वे रुळावर आरोपी राजुचा मृतदेह आढळला आहे. आरोपी राजूने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हातावरील टॅटूवरून आरोपीची ओळख पटली आहे. पोलिसांनी आरोपीचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या