औषधांच्या निर्यातीस परवानगी मिळताच धमकी देणाऱ्या ट्रम्प यांनी केली मोदींची तारीफ

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मलेरियाच्या इलाजासाठी वापरले जाणापे औषध हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे उपयोगी पडू शकते असे बोलले जात आहे. या औषधाचा हिंदुस्थान मोठा उत्पादक असून अमेरिकेसह इतर देशांनी या औधधासाठी हिंदुस्थानकडे मदत मागितली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे औषध मिळालं नाही तर जशास तसे उत्तर देऊ असे म्हणत उघडपणे हिंदुस्तानला धमकावलं होतं. मंगळवारी हिंदुस्थानने या औषधाच्या निर्यातीला मंजुरी दिली. हे कळताच डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तारीफ करायला सुरुवात केली आहे.

निर्यातीला परवानगी मिळाल्यानंतर औषधांची पहिली खेप अमिरेकेला रवाना झाली आहे. अमेरिकेत कोरोनाने अक्षरश: थैमान घातले असून तिते आतापर्यंत 4 लाख कोरोनाग्रस्त सापडले आहेत तर 13,000 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे चिंतेत पडलेल्या अमेरिकेला हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे तातडीने हवं होतं. हिंदुस्थानने या औषधांची निर्यात करायला सुरुवात केल्याचं कळाल्यानंतर ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजला फोनवरून दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलंय की ” मी या औषधाची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली आहे. 2.9 कोटींपेक्षा अधिक खुराक खरेदी करण्यात आला आहे. मी पंतप्रधान मोदींशी याबाबत बोललो होतो, मी त्यांना विचारलं होतं की तुम्ही या औषधाचा पुरवठा कराल का ? ते (मोदी) खूप महान आहेत, खरंच ते चांगले आहेत.खरेदी करण्यात आलेल्या औषधापैकी बहुतांश औषधे ही हिंदुस्थानातून येत आहेत.

ट्रम्प यांनी मंगळवारी औषध देत नसल्यामुळे हिंदुस्थानला धमकी दिली होती. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या औषधांसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही धमकी दिली होती. अमेरिकेने या औषधांसाठी हिंदुस्थानकडे यापूर्वीही मागणी केली होती. हिंदुस्थानने या मागणीवर सोमवारपर्यंत निर्णय न घेतल्याने अमेरिकेने पुन्हा यासाठी मागणी केली होती. मात्र ही मागणी करत असतानाच ट्रम्प यांनी हिंदुस्थानला धमकीही दिली होती. ट्रम्प यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी ते म्हणाले की “मी रविवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. जर ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन’ चा आमचा पुरवठा सुरू केला तर आम्ही तुमचे आभारी असू. मात्र जर हा पुरवठा सुरू झाला नाही तर तरी काही हरकत नाही. मात्र मग आम्हीही जशास तसं उत्तर देऊ”.

अमेरिकेमध्ये कोरोना आजाराने भयंकर उग्र रुप धारण केलं आहे. तिथे या आजारामुळे मरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर तिथले विरोधी पक्ष आणि माध्यमे ही परिस्थिती नीट हाताळू शकत नसल्याचा आरोप करत आहेत. देशातील वाढत्या चिंतेमुळे त्रस्त झालेल्या ट्रम्प यांनी मंगळवारी हिंदुस्थानला हायड्रॉक्सीक्लोकोक्वीन औषधासाठी धमकी दिली होती. बुधवारी त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेलाच धमकी देऊन टाकली आहे. कोरोनाशी मुकाबला करत असतेवेळी जागतिक आरोग्य संघटना ही चीनकडे जास्त लक्ष देत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.

ट्रम्प यांनी एक ट्विट केलं आहे ज्यात त्यांनी म्हटलंय की “जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून सर्वाधिक निधी मिळतो. असं असूनही त्यांचं सगळं लक्ष चीनवर केंद्रीत झालेलं आहे. आम्ही त्यांना दिल्या जाणाऱ्या निधीबाबत आता विचार करणार आहोत. चीनसोबतच्या सीमा खुल्या करण्याचा त्यांनी सल्ला दिला होता, हा सल्ला मी आधीच नाकारला ते बरं झालं. त्यांनी असा सदोष सल्ला का दिला?” जागतिक आरोग्य संघटनेने अमेरिकेला, चीनच्या विमानांना येण्यास मुभा द्यावी असा सल्ला दिला होता. हा सल्ला ट्रम्प यांनी धुडकावून लावला होता.

आपली प्रतिक्रिया द्या