मलाही शाळेत जायचंय…

220

एकनाथ आव्हाड

आयं आलीस व्हय कामावून… कित्ती येळ लावलास गं आज घरी यायला… दिवाबत्तीची सांजची येळ झालीय. परशा तर सारखं मला इचारत व्हता, ‘आयं कधी येणार, आयं कधी येणार म्हणून. कशीतरी काढली मी त्याची समजूत, पण गुलाम ऐकतोय कसला. त्याची भुणभुण एकसारखी सुरूच. आता तुला पाहिल्यावर गडी खुललाय बघ कसा. खरं तर आम्ही दोघंबी तुझ्या वाटंकडं डोळं लावून बसलो व्हतो. तू कधी घरी येशील आणि तुला आज घडलेली गोष्ट कधी सांगेल असं झालं व्हतं बघ आमचं. अगं, नको लगेच घायकुतीला येऊस. काय आक्रीत घडलं म्हणून सारखी विचारूस. सांगतेय… सांगतेय सगळं सांगतेय. आधी बस थोडा येळ शांत. तुझ्या जीवाला आरामच नाय. नुसतं काम… काम न् काम. काय म्हणालीस? सगळं बाजूला राहू दे, आधी काय घडलं ते सांग. अगं तेच सांगतेय बाई. जरा दम धरशील की नाही.

आयं, तू सकाळीच रोजगार हमी योजनेच्या कामावर गेल्यावर घरी कोण आलं व्हतं ठावं हाय? अगं गावच्या झेडपीच्या शाळेतले गुरुजी आले व्हते. घरच्या कामामुळं परशाला संभाळायला लागत असल्यामुळं मला साळंत जायला जमत नव्हतं म्हणून गुरुजी घरी आले. त्यांनी सारं कसं समजावून सांगितलं. परशालाबी साळंत पयलीला घालू म्हणाले. माझी मधीच साळा हुकली म्हणून मला म्हणाले, ‘कमल, पोरी तुला चांगलं डोकं हाय. कायबी झालं तरी साळा नको चुकवूस. रोज साळंत ये.’ आन् आयं गेले की ते आम्हा दोघांनाबी साळंत घेऊन. खूप दिसांनी साळंत पाय ठेवला. बा देवाघरी गेल्यानंतर मला घरच्या कामामुळं साळंत जाताच आलं न्हाय. दिवसभर साळंत बसून, अभ्यास करून, कविता, गाणी म्हणून अभाळाएवढा आनंद झाला बघ. दुपारी जेवायला खिचडीबी मिळाली साळंत. गुरुजींनी माझं खूप कौतुक केलं. त्यांच्या बोलानं माझा जीव हरकून गेलाय. परशाबी जाम खूश व्हता. साळंत नव्या नव्या गोष्टी शिकाय मिळाल्या. आयं, शिक्षणानं पंखात नवं बळ घेऊन आता मला उंच उडू दे!

म्या आता ठरवलंय… म्या रोज साळंत जाईन. साळा शिकीन, बुकं वाचीन, घरचं कामबी करीन. पन् आयं म्या रोज साळंत जाईन.

आयं, ‘मी एक शिकले तर आपला परशाबी शिकल. शिक्षणाचं मत्त्व त्याच्याबी डोक्यात बसंल. साळंमुळंच हा इस्वास म्या खरा करून दावीन. आयं, कामाच्या पगाराचा तुझा हिशेब नेहमी चुकतो ना, म्या आता तुलाबी वाचाय-लिहाय शिकवणार हाय. काय म्हणालीस? शिकायचं वय गेलं तुझं? अगं, शिकायला वयाचं कायबी नसतं. फकस्त शिकायची जिद्द असली पायजे. मी तर शिकून खूप मोठ्ठी कलेक्टर व्हणार बघ. थोडी कळ काढ. माझं हे सपान मी खरं करून दावीन.

आयं, गुरुजी साळंत म्हणाले, ‘साळा माणसाचा तिसरा डोळा हाय’. पण तुला खरं सांगू का, ‘साळा आपल्यासाठी अगं भाकरीचा गोळा हाय.’ अडाणी राहून नाय चालायचं. साळंमुळंच म्या आपली गरिबी दूर सारीन.’

आयं, डोळय़ाला पदूर कशापायी लावलास गं? अगं, मला घरच्या कामाचा तरास न्हाय. मी, परशा अन् तू. आपण तिघंच एकमेकांना आधार. तू दारचं काम बघ. मी घरचं काम बघीन. अगं तुझीच लेक हाय मी. कष्टाला मागं न्हाय सरणार. म्या समदं पाईन, पन आता म्या अन् परशा रोज साळंला जाईन.

डोळं पुस बघू आणि आता आल्या आल्या नको घरच्या कामाला बिलगूस. मी चहा करते. चहा घे. जरा बरं वाटंल तुला. घरासाठी तुझी वणवण ठावं हाय मला. एका घोटासाठीबी आराम न्हाय मिळत तुला. मी कापडं सारी धुतलीत, पाणी भरून ठिवलंय अन् मेथीची जुडीबी खुडून ठिवलीय. भाकऱया तेवढय़ा शिकव मला. मग सांजच्याचा सयपाक मीच करीत जाईन. ‘परशा, तुला देऊ का रं चहा-बटर? चहा बटर खा अन् मी लिहून दाखिवलेली बाराखडी वाचायला घे. उद्या साळंत बाईंना धडाधडा वाचून दाखीव. ऐकशील ना ताईचं? आयं, ऐकलं म्हणतोय. साळंनं त्याला बी लळा लावलाय बघ.

 

आपली प्रतिक्रिया द्या