युट्यूबमधून मिळणारी माझी सर्व कमाई दान करणार; ऋषभ पंतचा मोठा निर्णय, नेटकऱ्यांनी केलं कौतुक

सध्या क्रिकेट विश्वातील सगळ्यात चर्चेत असलेले टी20 वर्ल्ड कप 2024 चे सामने सुरु आहेत. या सामन्यांमध्ये टीम इंडिया उत्तम कामगिरी करत आहे. दरम्यान ऋषभ पंतने टी20 वर्ल्ड कप 2024 द्वारे टीम इंडियामध्ये पुनरागमन केले. आतापर्यंत तो या स्पर्धेत चांगल्या फॉर्ममध्ये दिसला आहे. आता टी20 विश्वचषकादरम्यान ऋषभ पंत यानं मोठी घोषणा केली आहे. युट्यूबमधून मिळणारी सर्व संपत्ती आणि विश्वचषकादरम्यान मिळणाऱ्या रक्कमेतील काही भाग दान करणार असल्याची घोषणा पंतने केली आहे. ऋषभ पंतच्या या निर्णायाचं सगळ्यांकडूनच कौतुक होत आहे.

फलंदाज ऋषभ पंतने 18 मे रोजी स्वत:चे यूट्यूब चॅनल सुरू केले होते. यानंतर त्याने आत्तापर्यंत एकूण सात व्हिडीओ अपलोड केले आहेत. ऋषभ पंतचा चाहतावर्ग फार मोठा असल्यामुळे अवघ्या 2 महिन्यातच त्याने एक लाख यूट्यूब सबस्क्राइबर्सचा टप्पा पूर्ण केला आहे. त्यामुळे यूट्यूबने त्याला सिल्व्हर प्ले बटण पाठवले आहे. पंतने यूट्यूब कम्युनिटी पोस्टमध्ये सिल्व्हर प्ले बटण असलेली एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने म्हटले आहे की, तो YouTube मधील सर्व कमाई, त्याच्या स्वतःच्या कमाईतील काही योगदानासह एका चांगल्या कारणासाठी दान करणार करणार असल्याचे म्हंटले आहे.

“हे सिल्व्हर प्ले बटण आपल्या सर्वांचे आहे. आम्ही एक लाखापर्यंत पोहोचलो आहोत. या प्रवासात आणखी लोक सामील होत आहेत. हा टप्पा अधोरेखित करण्यासाठी मी माझ्या स्वतःच्या कमाईतील काही योगदानासह YouTube मधून मिळणारी सर्व कमाई चांगल्या कामासाठी दान करत आहे. या प्लॅटफॉर्मचा उपयोग चांगल्या बदलासाठी आणि सुधारण्यासाठी करूया.” असे ऋषभ पंतने कम्युनिटी पोस्टमध्ये लिहिले आहे.