मी सध्या बेरोजगार; पंकजा मुंडे यांचा परळीतून ‘एक तीर दो निशान’

बीडच्या परळीमध्ये भाजपने नवरात्रौत्सवानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या वेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना ‘मी सध्या बेरोजगार आहे. त्यामुळे मला तुमची प्रार्थना आवडली’ असं म्हणत ‘एक तीर से दो निशान’ साधले आहेत.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, ‘काकांनी देवीच्या कानात सांगितलं तर ताईंना सांग की मला काही काम द्या. मला खूप आनंद झाला. कारण मी जर काम देऊ शकते याचा अर्थ मलाही काम मिळेल. मात्र सध्या मी बेरोजगारच आहे. त्यामुळे मला तुमची प्रार्थना आवडली. यालाच म्हणतात एक तीर से दोन निशान’.

पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यानं पुन्हा एकदा त्यांच्या नाराजीच्या चर्चांना उधाण आलं आहे. या आधी ‘काँग्रेस पक्षात वंशवादाचे राजकारण सुरू आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे. मीसुद्धा वंशवादाचे प्रतीक आहे; पण मला कोणी संपवू शकत नसल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्याचे वृत्त विविध वाहिन्यांनी प्रसिद्ध केले होते. मात्र हे वृत्त पंकजा मुंडे यांनी फेटाळून लावलं होतं.