स्वबळावर आमचा आमदार-खासदार निवडून येऊ शकत नाही याची खंत!

सामना प्रतिनिधी । नगर

रिपब्लिकन पक्षाला 61 वर्षे पूर्ण होत आहेत. महाराष्ट्रात प्रचंड ताकद आहे, कार्यकर्त्यांची फौज आहे मात्र एवढे असून देखील स्वबळावर आमचा आमदार-खासदार निवडून येऊ शकत नाही, अशा शब्दात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना खंत व्यक्त केली. निवडणुकीमध्ये अर्ध्या जागा दलितांना तर अर्ध्या जागा दलितेतरांना देता येतील का, या संदर्भातला प्रस्तावही आम्ही तयार करणार असल्याचेही आठवले यांनी स्पष्ट केले.

नगर येथे रिपब्लिकन पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे, त्यासाठी आलेल्या आठवले यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, रिपब्लिकन पक्षाला 61 वर्षे होत आहेत. त्यानिमित्त 3 ऑक्टोबरला आम्ही प्रचंड मोठ्या मेळाव्याचे आयोजन करणार आहोत. आमचा एकही आमदार, खासदार स्वबळावर निवडून येऊ शकत नाही म्हणून आम्ही आता पक्षाच्या वतीने एक वेगळा विषय हाती घेतला आहे. त्यासाठी एक वेगळा प्रस्ताव तयार करण्यात येत असून निवडणुकांमध्ये अर्ध्या जागा या दलितांना व अर्ध्या जागा दलितेतर घटकांना दिला जाव्यात, असा आमचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. लोकसभा निवडणूक 2019 ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढणार आहोत आणि जिंकणारही असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती झाली तर आम्ही दोन जागा लोकसभेच्या मागणार आहोत. जर युती झाली नाही तर चार जागा लोकसभेकरीता मागणार आहोत. तसेच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजप युती झाली तर आम्ही 12 ते 13 जागा मागणार आहोत जर युती झाली नाही तर पक्ष 25 जागा मागेल, असे आठवले यांनी यावेळी स्पष्ट केले.

लोकसभा शिर्डीतून नाही तर मुंबईतून लढणार

लोकसभा निवडणूक आपण शिर्डी येथून लढणार नाही तर मुंबई येथील मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहोत. लोकसभेसाठी जर युती झाली तर मी मुख्यमंत्र्यांकडे मुंबईच्या मतदारसंघाची मागणी करणार असल्याचेही आठवले यांनी यावेळी सांगितले.

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने 70 वर्षात काय केले व आम्ही पाच वर्षात काय केले याचा हिशोब जनतेसमोर मांडणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. काँग्रेसचे राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यात एक्सपर्ट झाले आहेत मात्र त्याचा परिणाम मतदानावर होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नोटाबंदीत मोदींचा स्वार्थ नाही

केंद्र सरकारने चार वर्षाच्या कार्यक्रमांमध्ये अनेक योजना राबवल्या आहेत. त्याचा लाभ सर्व घटकांना मिळाला आहे. मात्र विरोधक नोटाबंदी व जीएसटी संदर्भात सरकारवर टीका करून विषय मांडत आहेत. नोटा बंदीचा विषय हा मोदींचा स्वार्थ नव्हता. सरकारकडे काळा पैसा जमा झाला पाहिजे. त्याच्यातून विकासाला चालना मिळाली पाहिजे, हा त्यामागचा उद्देश होता. जीएसटी संदर्भामध्ये सुद्धा अनेक बदल करण्याचे काम सुरू आहे. मंत्री अरुण जेटली यांच्या माध्यमातून अजूनही बैठका होत असून निश्चितपणे प्रलंबित प्रश्न आहेत, ते मार्गी लावले जातील, असेही आठवले यांनी यावेळी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या