मी न्यायालयाचा अवमान केलेला नाही- न्यायमूर्ती करनन

60

सामना ऑनलाईन । चेन्नई

न्यायमूर्ती सी. एस. करनन यांनी राष्ट्रपतींना पत्र पाठवून, आपण सर्वोच्च न्यायालयाचा कोणत्याही प्रकारे अवमान केलेला नाही. आपल्याला बेकायदा पद्धतीने पदावरून हटवण्यात आले आहे. तसेच घटनेची चौकट मोडून सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे असे नमूद केले आहे. या पत्राची प्रत त्यांनी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन, संसदेतील खासदार आणि सर्व पक्षांच्या प्रमुखांना पाठवून या समस्येत लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

हे पत्र मी जड अंतःकरणाने लिहीत आहे. सरन्यायाधीश यांनी माझ्यावर अन्याय करून कायद्यात न बसणाऱ्या पद्धतीने मला शिक्षा सुनावली आहे. माझ्याकडून कोणत्याही प्रकारे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झालेला नाही. जे काम मी केलेच नाही त्याचा दोष देत मला सहा महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. माझा दोष काय, मी न्यायालयाचा काय अवमान केला असा सवाल त्यांनी पत्रात केला आहे.

अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कालिको पूल यांनी आपल्या सुसाइड नोटमध्ये सरन्यायाधीश यांच्यावर कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या आरोपांना मी वाचा फोडली. त्यांची सुसाइड नोट दाबण्यात आली. या प्रकरणावर साधा एफआयआरही दाखल करण्यात आला नाही. मी मांडलेल्या या मुद्द्यांची दखल घेण्यात यावी आणि सरन्यायाधीशांना त्यांच्या अधिकारात नसताना घटनेची चौकट मोडत माझ्यावर कारवाई केली याची दखल घेण्यात यावी अशी मागणीही करनन यांनी केली आहे.

राष्ट्रपतीच मला पदावरून दूर करू शकतात
राष्ट्रपतींनी माझी न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती केलेली आहे. महाभियोग चालवून तेच मला पदावरून दूर करू शकतात. त्यासाठी संसदेच्या दोनतृतीयांश संमतीची गरज आहे. मात्र सात न्यायमूर्तींच्या पीठाने मला दोषी ठरवून शिक्षा ठोठावली. हे कोणत्याही न्यायालयीन चौकटीत बसणारे नाही. तसेच या निर्णयाने राज्यघटनेची आणि संसदेच्या अधिकारांची पायमल्ली करण्यात आली आहे, असे करनन यांनी पत्रात म्हटले आहे.

न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचाराबाबत मी आवाज उठवला त्याची कायद्यात न बसणारी शिक्षा देण्यात आली. मी भ्रष्टाचारी न्यायमूर्तींवर आरोप केले होते. न्यायाधीश न्यायाने वागण्याची शपथ घेतात. त्यांना निर्भीडपणे आणि निःपक्षपातीपणे हे काम करता आले पाहिजे. न्यायव्यवस्था भ्रष्टाचारमुक्त हवी यासाठी मी आवाज उठवला तर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी मला दोषी ठरवून शिक्षा देण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या