राजकारणातले प्रदूषण साफ करण्याचे मशीन माझ्याकडे!

25

 उद्धव ठाकरे यांचा टोला

मुंबई – प्रदूषण सगळीकडेच झाले आहे. राजकारणातसुद्धा प्रदूषण आहेच. पण राजकारणातले प्रदूषण साफ करण्याचे मशीन माझ्याकडे आहे. अधूनमधून ते आपण साफ करीत असतो, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज लगावला.
कलानगर जंक्शन येथे वायू शुद्धीकरण यंत्राचे तसेच ग्रामीण भागातील जनतेला रोजगार उपलब्ध करून देणार्‍या शिव ग्रामीण टॅक्सी योजनेचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनेचे मंत्री काय करू शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे या योजना आहेत. श्‍वास घ्यायचा तर शुद्ध हवा पाहिजे आणि घास घ्यायचा तर अन्न पाहिजे. सगळीकडे बेकारी आणि प्रदूषणाचे वातावरण असताना जनतेला जगण्यासाठी लागणारा श्‍वास आणि घास देण्याचे काम शिवसेनेने केले आहे. यावेळी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते परिवहनमंत्री दिवाकर रावते, पर्यावरणमंत्री रामदास कदम, आमदार भरत गोगावले, तृप्ती सावंत, विभागप्रमुख-आमदार अ‍ॅड. अनिल परब, आदेश बांदेकर आदी उपस्थित होते.

शुद्ध पाणी… हवा देणारी प्रत्येक गोष्ट शिवसेनेला पाहिजे
मेट्रो कारशेडसाठी आरेची झाडे कापली जाणार आहेत का ते बघायला पाहिजे. नाहीतर मेट्रोने जायचे कुठे हॉस्पिटलमध्ये. पालिकेने वायूचे प्रदूषण रोखण्यासाठी पुढाकार घेतला. पण बॅटरीवर चालणार्‍या बेस्ट बसचा प्रस्ताव कुणी लटकवला? मुंबईकरांना शुद्ध पाणी… हवा देणारी प्रत्येक गोष्ट शिवसेनेला पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

ही रिक्षा महिलांना सुरक्षित वाटायला हवी!
या रिक्षाचा रंग अबोली आहे. हा रंग अबोल नाही, फार बोलका आणि गर्दीत पटकन दिसणारा आहे. हा रंग दिसल्यानंतर महिलेला कळले पाहिजे की ही रिक्षा मला सुरक्षित घरी घेऊन जाईल. रिक्षावर अनेकांचे झेंडे लागलेले असतात. पण ज्या रिक्षावर माझ्या शिवसेनेचा झेंडा असेल त्या रिक्षामध्ये माझी भगिनी ही बिनधास्त बसली पाहिजे. एवढा विश्‍वास असला पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

शिव ग्रामीण टॅक्सीमुळे हजारोंना रोजगार – दिवाकर रावते
तीन चाकी रिक्षाऐवजी सहा आसनी तसेच चार आसनी चार चाकी टॅक्सीचा पर्याय आल्यामुळे हजारो लोकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले. रायगडात अशा प्रकारच्या रिक्षा सुरू कराव्यात अशी मागणी स्थानिक आमदारांकडून करण्यात येत होती. त्याच पार्श्‍वभूमीवर या नारंगी आणि सफेत रंगाच्या चार चाकी टॅक्सींची योजना राबविण्यात येत असल्याचे दिवाकर रावते म्हणाले.

शिवसेनेमुळे अडगळीतले खाते उजेडात आणू शकलो! – रामदास कदम
वन आणि पर्यावरण या खात्याचे धड आणि शरीर एकीकडे करून फक्त पर्यावरण खाते पदरात पडले. पर्यावरण हे अडगळीत पडलेले खाते, पण हे खाते शिवसेनेमुळे उजेडात आणू शकलो असे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सांगितले. दिल्लीतले प्रदूषण मुंबईत येऊ देणार नाही. ते प्रदूषण मुंबईत येऊ न देण्यात आम्ही यशस्वी झालो.

आपली प्रतिक्रिया द्या