अनधिकृत पुतळ्याच्या अनावरणाला राज्यपालांना बोलावले, ‘आय लव्ह मुंबई’संस्थेकडून अवमान

सामना ऑनलाईन, मुंबई

महापालिकेकडून परवानगी मिळालेली नसताना महालक्ष्मी रेसकोर्ससमोरील उद्यानात शायना एनसी यांच्या संस्थेकडून बैलाचा एक कलात्मक पुतळा उभारण्यात आला आहे. विशेष म्हणजे अशा अनधिकृत पुतळ्याचे अनावरण राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते आज करण्यात आले. हा पुतळा उभारण्यासाठी पालिकेची परवानगी मिळालेली नसताना गुपचूप केलेल्या या अनावरण कार्यक्रमाद्वारे ‘आय लव्ह मुंबई’ने राज्यपालांचाच अवमान केला आहे.

महालक्ष्मी रेसकोर्ससमोरच्या उद्यानात आज बैलाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना बोलावण्यात आले होते. या कार्यक्रमाला ‘आय लव्ह मुंबई’च्या शायना एन. सी. आणि गौरी खानही उपस्थित होत्या. राज्यपाल आल्याचे समजताच पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे तिथे धावत आल्या.

पुतळ्याचे गुपचूप अनावरण करून कार्यक्रम आटोपता घेत असतानाच महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम आटोपून निघालेल्या नगरसेविका अरुंधती दुधवडकर आणि माजी नगरसेवक अरुण दुधवडकर यांच्या ही बाब निदर्शनास आली. डी वॉर्डचे सहाय्यक आयुक्त देवीदास क्षीरसागर यांच्याकडे त्यांनी या कार्यक्रमाबद्दल विचारणा केली असता त्यांना या कार्यक्रमाची माहिती नव्हती. राज्यपालांसारख्या सर्वोच्च पदाच्या व्यक्तीच्या हस्ते पार पडलेल्या कार्यक्रमाला मोजून १० ते १५ जण उपस्थित होते अशी माहिती दुधवडकर यांनी दिली. अशा कार्यक्रमांना पालिकेचे अधिकारी, स्थानिक नगरसेवक, आमदार, खासदार, महापौर यांना बोलावणे अपेक्षित असताना गुपचूप कार्यक्रम करून संस्थेने राज्यपालांचाच अवमान केल्याची प्रतिक्रिया दुधवडकर यांनी व्यक्त केली.

आयुक्तांना पत्र लिहिणार
दरम्यान, या पुतळ्यासाठी संस्थेने डी वॉर्ड सहाय्यक आयुक्तांकडे परवानगीसाठी अर्ज केला होता. डी वॉर्डकडून हा प्रस्ताव पालिका आयुक्तांकडे पाठवण्यात आला, मात्र पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी त्याला मंजुरी देण्याआधीच हा कार्यक्रम करण्यात आला. त्यामुळे पालिकेला अंधारात ठेवून केलेल्या या गंभीर प्रकरणी पालिका आयुक्तांना आणि महापौरांना पत्र लिहिणार असल्याची माहिती दुधवडकर यांनी दिली.