भाजप नेत्याच्या घरावर आयकर विभागाचा छापा

सामना ऑनलाईन। भोपाळ

नोटाबंदीनंतर काळा पैशांविरोधात आयकर विभागाने जोरदार मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेंतर्गत आज मध्यप्रदेशमध्ये भाजप नेते सुशील वासवानी यांच्या घरावर तसेच कार्यालयावर आयकर विभागाने छापे घातले. यात काही महत्वाची कागदपत्रे अधिका-यांच्या हाती लागल्याचे समजते.

वासवानी यांनी ८ नोव्हेंबर नंतर एका सहकारी बँकेत उत्पनापेक्षा अधिक रोख रक्कम जमा केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यांच्याकडे ही रक्कम कुठुन आली व ती नोटाबंदीनंतरच बँकेत का जमा करण्यात आली असे अनेक प्रश्न आयकर विभागाने उपस्थित केले आहेत. याबददल लवकरच वासवानी यांची चौकशी करण्यात येणार आहे.

नोटाबंदीनंतर काळ्याचे पांढरे करण्यासाठी काळे पैसेवाल्यांची धावाधाव सुरु आहे. काळ्याचे पांढरे करण्यासाठी काही जणांनी कोट्यवधी रुपयांची सोने खरेदी केली तर काही जणांनी बँक कर्मचा-यांशीच हातमिळवणी करत काळ्या पैशांची अनियमित देवाणघेवाण केल्याचे समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील बँकांमधील प्रत्येक व्यवहारावर आयकर विभाग, सक्तवसुली संचनलालय, पोलीस, प्राप्तिकर विभाग लक्ष ठेवून आहेत.

आयकर विभागाने मंगळवारी चेन्नईतील एका ज्वेलर्सच्या दुकानावर छापा घातला. त्यात दहा कोटी रुपयांच्या जुन्या नोटा आणि सहा किलो सोने आयकर विभागाने जप्त केले आहे.

आयकर विभागाने मंगळवारी मेरठमधील एका सरकारी आभियंताच्या घरावर छापा घातला. यात २ कोटी ६७ लाख रुपये जप्त करण्यात आले. यात १७ लाख रुपयांच्या नव्या नोटा व ३० किलो सोने जप्त करण्यात आले आहे.