मला साक्षात देवा-देवींनी सांगितले डोण्ट वरी, भाजपमध्ये जा!

भाजपने फोडाफोडीचे राजकारण सुरूच ठेवले असून, गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांच्यासह काँग्रेसच्या आठ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे गोवा विधानसभेत काँग्रेसचे केवळ तीन आमदार राहिले आहेत. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पत्रकारांनी निवडणुकीपूर्वी देवासमोर घेतलेल्या शपथेबाबत विचारलं. यावर उत्तर देताना कामत म्हणाले की, मी देवालाच विचारले की काय करू ? यावर देवानेच मला उत्तर दिले.

कामत यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मी मंदिरात गेलो होतो. मी देवी-देवतांना विचारले की मी भाजपमध्ये जायचा विचार करत आहे,मी काय करू ? देव मला म्हणाले की…डोण्ट वरी, जा भाजपमध्ये. गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या सगळ्या उमेदवारांनी गोव्यातील मंदिरे, चर्च, मशिदीत जाऊन शपथ घेतली होती की आम्ही काँग्रेसमध्येच राहू आणि 5 वर्षे काँग्रेस सोडणार नाही. इतकेच नाही तर काँग्रेसने या सगळ्या उमेदवारांकडून एकनिष्ठतेचे प्रतिज्ञापत्रही घेतले होते.