दोषी आढळलो तर फाशी घेईन! गंगेत पदके सोडणे हा इमोशनल ड्रामा असल्याचे बृजभूषण सिंह यांचे विधान

पैलवानांनी केलेल्या आरोपांवर कुस्ती मगासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांनी उत्तर देताना म्हटलंय की जर मी दोषी ठरलो तर मी फाशी घेईन. उत्तर प्रदेशातील बाराबंकीमध्ये एका जाहीर सभेत बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे.सिंह यांनी या सभेत बोलताना म्हटले की माझ्यावर केलेला एक जरी आरोप खरा निघाला तर मी फाशी घेईन. या सभेत भाषण करत असताना सिंह यांनी आंदोलन करणाऱ्या पैलवानांवरही टीका केली. सिंह यांनी म्हटले की, 4 महिने ते मला फासावर लटकावण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र सरकार मला फासावर लटकवत नाहीये. यामुळे पैलवान हरिद्वारे इथे जमले आणि त्यांनी त्यांचे पदके गंगेत सोडून देण्याचा इशारा दिला. यामुळे मला शिक्षा होणार नाहीये. हा सगळा इमोशनल ड्रामा आहे.

सिंह यांनी सभेत बोलताना म्हटले की, तुमच्याकडे काही पुरावे असतील तर ते कोर्टासमोर सादर करा. कोर्ट देईल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. दिल्ली पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून त्यांना आरोपांत तथ्य दिसलं असतं तर मला अटक झाली असती.

दिल्ली पोलिसांनी म्हटलंय की आतापर्यंत सिंह यांच्याविरोधात करण्यात आलेल्या आरोपांमध्ये तथ्य दिसून आलेलं नाही, यामुळे त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. येत्या 15 दिवसांत पोलीस आपला अहवाल कोर्टासमोर सादर करणार आहे. हा अहवाल आरोपपत्राच्या स्वरुपात असेल किंवा अंतिम अहवालाच्या स्वरुपात असेल. दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे की, सिंह यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांना बळकटी देणारे पुरावे सापडलेले नाहीयेत. सिंह हे साक्षीदारांना प्रभावितही करत नाहीयेत आणि पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न करत नाहीयेत असं पोलिसांचं म्हणणं आहे. बृजभूषण सिंह यांच्याविरोधात ऑलिम्पिकपटू बजरंग पुनिया , साक्षी मलिक, विनेश फोगट यांनी आंदोलन सुरू केलं असून सिंह यांच्या लैंगिक छळाचे आरोप करण्यात आले आहेत.