यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही – उमा भारती

uma-bharti

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

केंद्रीय मंत्री व भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी यापुढे कोणतीही निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. दोनवेळा खासदार झालेल्या भारती यांनी आपण कमी वयात पक्षासाठी खूप काम केलं. त्याचा परिणाम आता जाणवत असून गुडघेदुखी व कंबरदुखीने ग्रस्त असल्याने चालणे फिरणे जमत नाही, यामुळेच हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. रविवारी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.

यावेळी वाढत्या वयामुळे यापुढे निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, पक्षासाठी काम करत राहणार असल्याचेही त्या म्हणाल्या. यावेळी राम मंदिर उभारणीवरही त्यांनी भाष्य केले. राम मंदिरप्रकरणी न्यायालयाने आपला निर्णय दिलेलाच आहे. यामुळे परपस्पर संमतीने आता मंदिर उभारणी झाली पाहिजे, असं त्या म्हणाल्या.

उमा भारती या सर्वप्रथम खजुराहो येथून खासदार म्हणून निवडून आल्या. त्यानंतर भोपाळनंतर त्या झाशीच्या खासदार आहेत. बडा मलेहरा आणि चरखारीच्या त्या आमदारही होत्या. बुंदेलखंडच्या प्रभावशाली आक्रमक हिंदूत्ववादी नेत्या अशी त्यांची ओळख आहे. गेल्या काही वर्षांपासून उमा भारती यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होत असून काही दिवसांपूर्वी त्यांना उपचारांसाठी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत दाखल करण्यात आले होते. त्याआधी २०१६ व २०१७ साली छातीत दुखत असल्याच्या व उच्च रक्तदाबाच्या तक्रारीनंतर एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या