मोदींशी यापुढे ‘खुलेआम’च बोलेन! यशवंत सिन्हा यांनी ठणकावले

58

सामना ऑनलाईन । जबलपूर

अर्थव्यवस्थेवरून भाजपचे केंद्र सरकार सतत टीकेचे लक्ष्य बनत असतानाही देशाचे अर्थ खाते एकेकाळी सांभाळलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भेट देईनासे झाले आहेत. त्यामुळे संतापलेल्या सिन्हा यांनी ‘मोदी यांच्याशी यापुढे खुलेआमच बोलेन’ असे जबलपूर येथे आज जाहीररीत्या ठणकावले.

विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आपण १३ महिन्यांपूर्वी भेटीसाठी पंतप्रधानांकडे वेळ मागितली होती, पण आपल्याला आजवर भेटीसाठी त्यांनी वेळ दिली नाही, असे त्यांनी सांगितले. यापुढे आपण सरकारमधील कोणत्याही व्यक्तीशी चर्चा करणार नाही. आता जे काही बोलायचे ते जाहीररीत्याच बोलत जाईन, असे सिन्हा म्हणाले.

अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी यांच्या काळातला भाजप वेगळा होता. पक्षाचा तळागाळातील कार्यकर्ताही दिल्लीत जाऊन त्या दिग्गज नेत्यांना भेटू शकत होता असे सांगत त्यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधला.

मोदींच्या योजना बिनकामाच्या
देशातील शेतकऱ्यांना हल्ली कोणीही विचारत नाही. मध्य प्रदेशातील शेतकऱयांची अवस्था दयनीय आहे, असे यशवंत सिन्हा यांनी सांगितले. शेतकऱयांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी मध्य प्रदेश सरकारने भावांतर योजना आणली, तर मोदी यांनी पीक विमा योजना सुरू केली, पण मोदी यांच्या योजना बिनकामाच्या आहेत, असा हल्ला त्यांनी चढवला.

आपली प्रतिक्रिया द्या