पालिकेच्या तीन प्रमुख रुग्णालयांवर आयएएस अधिकार्‍यांची नियुक्ती; कोरोना रोखण्यासाठी नेमणूक

838

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रभावी काम करण्यासाठी पालिकेच्या प्रमुख तीन रुग्णालयांवर तीन ‘आयएएस’ अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी ही नियुक्ती केली आहे. यामध्ये नायर रुग्णालयासाठी मदन नागरगोजे, ‘केईएम’साठी अजित पाटील आणि शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयासाठी बालाजी मंजुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सनदी अधिकार्‍यांच्या नियुक्तीनंतर पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी संबंधित सनदी अधिकार्‍यांसोबत बैठक घेऊन ‘कोविड कोरोना 19’च्या अनुषंगाने महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये असलेल्या सेवा सुविधा आणि मनुष्यबळाविषयी चर्चा केली. पालिकेच्या बी. वाय. एल. नायर रुग्णालयाची जबाबदारी सोपवण्यात आलेले मदन नागरगोजे हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2007 च्या तुकडीचे अधिकारी असून ते सध्या राज्य शासनात उपसचिव या पदावर कार्यरत आहेत. केईएम रुग्णालयाचे व्यवस्थापकीय दायित्व सोपविण्यात आलेले अजित पाटील हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या वर्ष 2007 च्या तुकडीचे अधिकारी असून ते सध्या महा-आयटी महामंडळाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. तर सध्या राज्य शासनाच्या नियोजन विभागात उपसचिव पदावर कार्यरत असणारे  बालाजी मंजुळे हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या वर्ष 2009 च्या तुकडीचे अधिकारी असून त्यांच्याकडे शीव येथील लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.

जेजे, जीटी रुग्णालयासाठीही विशेष अधिकारी
मुंबईतील जी. टी. रुग्णालय आणि जे. जे. रुग्णालय या राज्य शासनाच्या अखत्यारीतील रुग्णालयांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी ही शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव सुशील खोडवेकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. ते भारतीय प्रशासकीय सेवेच्या वर्ष २०११ च्या तुकडीतील अधिकारी आहेत. खोडवेकर हेदेखील महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनात आज आयोजित बैठकीला उपस्थित होते. या अधिकार्‍यांना त्यांचे राज्य शासनातील काम सांभाळून रुग्णालयांच्या व्यवस्थापनाचे काम तात्पुरत्या स्वरूपात बघावयाचे आहे, असेही संबंधित आदेशात नमूद करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या