इंदिरा नुई आयसीसीच्या पहिल्या स्वतंत्र महिला संचालक

42

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पेप्सिकोच्या चेअरमन आणि सीईओ इंदिरा नुई यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी)च्या पहिल्या स्वतंत्र महिला संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. येत्या जून महिन्यापासून नुई आयसीसीच्या संचालक पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. दोन वर्षांसाठी नुई यांची आयसीसीच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली मात्र त्यांचा कार्यकाल वाढवला जाऊ शकतो. आयसीसीच्या संचालकपदाचा स्वतंत्र कार्यभार एका महिलेच्या हाती सोपवण्याचा निर्णय आयसीसी काउन्सिलनं गेल्या वर्षी जून महिन्यात घेतला होता.

आयसीसीच्या संचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर बोलताना नुई म्हणाल्या की, ‘मला क्रिकेटची आवड आहे आणि मी कॉलेजला असताना क्रिकेट खेळली आहे. या जबाबदारीसाठी आयसीसीशी जोडली गेलेली पहिली महिला म्हणून मी आनंदी आहे.’ आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी म्हटलं की, ‘एक महिलेची आयसीसीच्या संचालकपदी नियुक्ती करुन आयसीसीला आणखी मजबूत बनवण्याच्या दिशेने उचललेलं पाऊल आहे.’

आपली प्रतिक्रिया द्या