… तर वर्ल्डकपमध्ये पुन्हा हिंदुस्थान-पाकिस्तान सामना शक्य

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप 2019 स्पर्धेत मंगळवारी यजमान इंग्लंडचा पराभव झाल्याने सेमी फायनलचे गणित अधिक क्लिष्ट झाले आहे. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा पराभव केल्याने पाकिस्तानसाठी सेमी फायनलचे द्वार उघडले गेले आहे. पुढील सर्व लढती जिंकत सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्याची पाकिस्तानकडे नामी संधी आहे. यामुळे यंदाच्या वर्ल्डकपमध्ये पुन्हा एकदा हिंदुस्थान आणि पाकिस्तानचा सामना होण्याची शक्यता वाढली आहे. 2011 मध्ये हे दोन्ही संघ सेमी फायनलमध्ये भिडले होते. या लढतीत हिंदुस्थानने पाकिस्तानचा पराभव केला होता आणि फायनलमध्ये श्रीलंकेला धूळ चारून विश्वचषक उंचावला होता.

CWC2019 : ऑस्ट्रेलिया सेमिफायनलमध्ये दाखल, इंग्लंडचा पाय खोलात

‘‘हिंदुस्थानी संघात चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार?’’

वर्ल्डकपची गुणतालिका पाहता इंग्लंड सध्या 8 गुणांसह चौथ्या क्रमांकावर विराजमान आहे, तर पाकिस्तानकडे सध्या 5 गुण आहेत. इंग्लंडने वर्ल्डकपची सुरुवात धमाकेदार केली असली तरी गेल्या दोन लढतीत त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्यामुळे त्यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. इंग्लंडला सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर पुढील दोन लढती जिंकाव्या लागतील. परंतु या दोन लढती आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये अपराजीत राहिलेल्या हिंदुस्थान आणि न्यूझीलंड संघाविरुद्ध आहेत. या दोन्ही लढतीत इंग्लंड पराभूत झाल्यास पाकिस्तानकडे मोठी संधी असेल. पाकिस्तानच्या तीन लढती असून यापैकी दोन लढतीत जरी त्यांनी विजय मिळवला आणि इंग्लंड पुढील दोन्ही लढतीत पराभूत झाल्याने पाकिस्तानला सेमी फायनलचे तिकीट मिळेल. पाकिस्तानसाठी जमेची बाब म्हणजे तीन पैकी दोन लढती अफगाणिस्तान आणि बांग्लादेश संघाविरुद्ध आहेत.

.. तर सेमीफायनलमध्ये दोन कट्टर प्रतिस्पर्धी भिडणार
हिंदुस्थान सध्या 9 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. हिंदुस्थानचे आणखी चार सामने बाकी आहेत. पुढील सर्व लढती जिंकल्या तर गुणतालिकेत हिंदुस्थान पहिल्या स्थानावर येईल आणि सर्व काही सुरळीत झाले तर पाकिस्तानचा संघ चौथ्या स्थानावर असेल. त्यामुळे नियमानुसार पहिल्या स्थानावर असणाऱ्या संघाचा सामना चौथ्या स्थानावर असणाऱ्या संघाशी होईल. याचा अर्थ मॅनेचेस्टरमध्ये पुन्हा एकदा हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यात सामना होईल. ग्रुप स्टेजमध्ये हिंदुस्थानने पाकिस्तानला 89 धावांनी पराभूत केले आहे.