आता रंगणार आयसीसी माध्यम हक्कांचा लिलाव, पुरुष आणि महिलांच्या क्रिकेट स्पर्धांसाठी तीन विशेष पॅकेजेस

आयसीसीने पुरुष आणि महिलांच्या क्रिकेट सामन्यांसाठी तीन विशेष पॅकेजेस सादर केले आहेत. पॅकेज ‘ए’मध्ये टीव्ही प्रक्षेपण हक्क, पॅकेज ‘बी’ मध्ये डिजिटल हक्क आणि पॅकेज ‘सी’मध्ये टीव्ही आणि डिजिटल असे दोन्ही हक्क आहेत. पुरुष गटात चार आणि आठ वर्षांसाठी माध्यम हक्क मिळवता येतील, तर महिला गटात केवळ चार वर्षांच्या कालावधीसाठी माध्यम हक्क मिळवता येऊ शकतात. या प्रक्षेपण हक्कांच्या लिलावात आता जगातील नामवंत क्रीडा आणि टीव्ही वाहिन्या कोटी कोटी डॉलर्सची उधळण करणार हे मात्र निश्चित झाले आहे.

गेल्याच आठवडय़ात हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचे माध्यम हक्क विकले. तीन दिवस चाललेल्या या ई-लिलावाद्वारे बीसीसीआयला विक्रमी 48 हजार 390 कोटी रुपये मिळाले. या माध्यम हक्क विक्री प्रक्रियेची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी चर्चा झाली. बीसीसीआयपाठोपाठ आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीनेदेखील माध्यम हक्क विक्रीसाठी निविदा खुल्या केल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) 20 जूनपासून माध्यम हक्क निविदा विकण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. या निविदा 2024 पासून पुढील आठ वर्षांच्या कालावधीमध्ये होणाऱया 711 सामन्यांसाठी असतील. आयसीसी एकूण तीन पॅकेज सादर करणार आहे. या पॅकेजमध्ये महिला अंडर-19 टी-20 विश्वचषकाचाही समावेश आहे. माध्यम हक्कांच्या निविदा विक्रीसाठी आयसीसी पारंपारिक सीलबंद प्रक्रियेचे पालन करणार आहे. याशिवाय पुरुष आणि महिला सामन्यांसाठी स्वतंत्रपणे बोली आयोजित केली जाणार आहे.

  आठ वर्षांत पुरुष, महिलांत 711 लढती खेळवणार

 “पहिल्यांदाच पुरुष आणि महिला क्रिकेटचे हक्क स्वतंत्रपणे विकले जातील. पुरुष क्रिकेटमधील 16 स्पर्धांसाठी आणि महिला क्रिकेटमधील आठ स्पर्धांसाठी बोली लावता येईल. 2024 पासून पुढील आठ वर्षांमध्ये दोन्ही गटांमध्ये अनुक्रमे 362 आणि 103 सामने होतील. या 465 सामन्यांव्यतिरिक्त, 19 वर्षांखालील पुरुष आणि महिला क्रिकेटचे सामनेदेखील आहेत. अशा प्रकारे एकूण 711 सामन्यांसाठी खरेदीदारांना बोली लावता येणार आहे.’’ असे आयसीसीने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.