रोहित ‘हीट’, आयसीसी क्रमवारीत पहिल्या पाचमध्ये दाखल

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

श्रीलंकेविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकल्यानंतर हिंदुस्थानी खेळाडूंनी आयसीसी क्रमवारीतही झेप घेतली आहे. मोहालीत नाबाद २०८ धावांची तडाखेबाज खेळी करणाऱ्या रोहित शर्माला क्रमवारीत चांगलाच फायदा झाला आहे. ताज्या क्रमवारीत रोहित शर्मा पहिल्या पाच फलंदाजांमध्ये दाखल झाला आहे. रोहितचे ८१६ पॉईंट झाले असून तो दोन स्थानांच्या फायद्यासह पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.

हिंदुस्थानचा सलामीवीर आणि लंकेविरुद्ध मालिकाविराचा पुरस्कार पटकावलेला शिखर धवन १४व्या स्थानावर पोहोचला आहे. लंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत विश्रांती घेतलेला हिंदुस्थानचा कर्णधार विराट कोहली पहिल्या स्थानावर कायम आहे. तर, दक्षिण आफ्रिकेचा तडाखेबाज खेळाडू एबी. डिव्हिलिअर्स दुसऱ्या, ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर तिसऱ्या आणि पाकिस्ताचा बाबर आजम चौथ्या स्थानावर आहे.

गोलंदाजांच्या क्रमवारीत हिंदुस्थानची नवी फिरकी जोडी युजवेंद्र चहल आणि कुलदिप यादव यांनी ताज्या क्रमवारीत भरारी घेतली आहे. चहल २३ स्थानांची हनुमान उडी घेत २८ स्थानावर पोहोचला आहे तर, कुलदिप यादव १६ स्थानांच्या उडीसह कारकिर्दीतील सर्वोच ५६व्या स्थानावर पोहोचला आहे. हार्दिक पांड्यालाही १० स्थानांचा फायदा झाला असून तो ४५व्या स्थानावर पोहोचला आहे.