गंभीर, विराटनंतर ‘दस नंबरी’ कामगिरी करणारा रोहित तिसरा खेळाडू

1571

हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिकेत झालेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत विराटसेनेने निर्भेळ यश मिळवले. विराटच्या नेतृत्वाखाली खेळताना टीम इंडियाने पाहुण्या संघाचा 3-0 असा धुव्वा उडवला. या मालिकेदरम्यान सर्वात चर्चेत राहिलेले नाव म्हणजे मुंबईकर रोहित शर्मा याचे. रोहितने पहिल्यांदाच कसोटीमध्ये सलामीला खेळताना धावांचा पाऊस पाडला. तीन लढतीत दोनदा सामनावीर आणि मालिकावीरचा पुरस्कार पटकावणाऱ्या रोहितला याचा आयसीसी क्रमवारीतही फायदा झाला असून हनुमान उडी घेत तो पहिल्या 10 खेळाडूंमध्ये सामील झाला आहे.

बीसीसीआय अध्यक्ष होताच गांगुलीचे धोनीच्या निवृत्तीवर विधान, म्हणाला…

हिटमॅन रोहितने आफ्रिकेविरुद्ध तीन कसोटी सामन्यात चार डावात फलंदाजी करताना दोन शतक आणि एक द्विशतक झळकावले. संपूर्ण मालिकेत रोहितने 529 धावा चोपल्या. आफ्रिकेविरुद्धची मालिका संपल्यानंतर आयसीसीने ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. यात रोहित पहिल्या 10 फलंदाजांमध्ये पोहोचला आहे. रोहित कसोटी कारकीर्दीत पहिल्यांदाच टॉप-10 मध्ये दाखल झाला आहे. रोहितने मालिकेत ऐतिहासिक कामगिरी करत 722 गुण मिळवले असून विराट, पुजारा आणि रहाणेसोबत तो पहिल्या 10 मध्ये विराजमान असणारा चौथा खेळाडू आहे. विशेष म्हणजे आफ्रिकेविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी तो 54 व्या स्थानावर होता.

तिन्ही फॉर्मेटमध्ये ‘दस नंबरी’ खेळ

विराट कोहलीनंतर कसोटी, एक दिवसीय आणि टी-20 क्रमवारीमध्ये टॉ-10 मध्ये असणारा रोहित फक्त दुसरा खेलाडू आहे. रोहित कसोटी क्रमवारीत दहाव्या, एक दिवसीय कारकीर्दीत दुसऱ्या आणि टी-20 क्रमवारीत आठव्या स्थानावर आहे. तर विराट कोहली एक दिवसीय क्रमवारीत नंबर एकवर, कसोटीत दुसऱ्या आणि टी-20 मध्ये दहाव्या स्थानावर विराजमान आहे. रोहित आणि विराटआधी अशी कामगिरी माजी खेळाडू गौतम गंभीर याने केली होती.

रहाणेचा जलवा…

टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे यानेही आफ्रिकेविरुद्ध दमदार कामगिरी केली. रहाणेने तब्बत तीन वर्षानंतर कसोटीत शतक झळकावले. ताज्या क्रमवारीत रहाणे नवव्या स्थानावर थेट पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. रहाणेसह पुजारा चौथ्या स्थानावर कायम आहे. मात्र खराब कामगिरीमुळे त्याने काही गुण गमावले आहेत.

कसोटी क्रमवारीतील पहिले 10 खेळाडू –

स्टीव स्मिथ (937), विराट कोहली (926), केन विलियमसन (878), चेतेश्वर पुजारा (795), अजिंक्य रहाणे (751), हेन्री निकोलस (749), ज्यो रूट (731), टॉम लॅथम (724), दिमुथ करुणारत्ने (723), रोहित शर्मा (722)

आपली प्रतिक्रिया द्या