ICC Ranking – विराटला धक्का, स्मिथ ‘नंबर वन’, दोन महिन्यात गमावले अव्वल स्थान

620

आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीमध्ये विराट कोहलीला आपले अव्वलस्थान गमवावा लागले आहे. ताज्या क्रमवारीमध्ये ऑस्ट्रेलियाचा मधल्या फळीतील फलंदाज स्टीव्ह स्मिथ याने विराटला मागे टाकत पहिले स्थान पटकावले आहे. स्मिथ 911 अंकांसह पहिल्या, तर विराट कोहली 906 अंकांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात विराट आपल्या नावाप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. दोन्ही डावांमध्ये मिळून त्याने फक्त 21 धावा केल्या. पहिल्या डावात तो 2 तर दुसऱ्या डावात 19 धांवर बाद झाला होता. याचा फटका त्याला ताज्या क्रमवारीत बसला आहे. विराटच्या खराब कामगिरीचा फायदा स्मिथला झाला आणि त्याने पहिल्या स्थानावर झेप घेतली. कसोटी क्रमवारीत टॉप टेनमध्ये रहाणे आठव्या, पुजारा नवव्या आणि अग्रवाल दहाव्या स्थानावर आहे.

‘नंबर वन’चे द्वंद्व
कर्णधार विराट कोहलीने 4 डिसेंबर 2019 रोजी स्मिथला मागे टाकत कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली होती. मात्र केवळ दोनच महिने कोहलीला हे अव्वल स्थान टिकवता आले. बुधवारी आयसीसीने जारी केलेल्या ताज्या क्रमवारीत स्टीव्ह स्मिथने पुन्हा एकदा नंबर वन स्थानी झेप घेतली आहे. याआधी 3 सप्टेंबर 2019 रोजी जारी झालेल्या कसोटी क्रमवारीत स्मिथने विराट कोहलीला मागे टाकत पहिल्या स्थानी झेप घेतली होती. विशेष म्हणजे त्यावेळी विराट कोहली सलग 13 महिने आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये अव्वल स्थानी होता.

बुमराहचीही घसरण
दुखापतीनंतर पुनरागमन केलेल्या जसप्रीत बुमराहची देखील गोलंदाजांच्या क्रमवारीत घसरण झाली आहे. पहिल्या कसोटीत बुमराहला विशेष चमक दाखवता आली नव्हती. ताज्या क्रमवारीत बुमराह 756 अंकांसह 11 व्या स्थानावर घसरला आहे. टॉप टेनमध्ये आर. अश्विन हा एकमेक हिंदुस्थानी गोलंदाज असून तो 765 अंकांसह नवव्या स्थानावर आहे. पॅट कमिन्स पहिल्या स्थानावर कायम आहे.

आपली प्रतिक्रिया द्या