अश्विन अष्टपैलूंत टॉपवर, आयसीसी गुणांकनात विराटची पुन्हा घसरण

23

सामना ऑनलाईन, दुबई

गेल्या चार कसोटी मालिकांत तुफानी खेळ करणारा टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटींतील अपयश भोवले आहे. ताज्या आयसीसी कसोटी गुणांकनात विराटची फलंदाजांत आणखी एका जागेने घसरण झाली असून ८४७ गुणांसह तो चौथ्या स्थानावर आला आहे. हिंदुस्थानी ‘स्टार’ ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने मात्र आपल्या कामगिरीतील यशाचे सातत्य राखत कसोटीतील अष्टपैलू क्रिकेटपटूंत पुन्हा टॉपचे स्थान पटकावण्याचा पराक्रम केलाय. अश्विनने गोलंदाजांतही आपले नंबर वन स्थान कायम राखले.

हिंदुस्थानी कर्णधार विराट कोहलीला कांगारुंविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटींतील चार डावांत ०, १३, १२ आणि १५ असे फलंदाजीत अपयश आल्याने आयसीसी कसोटी गुणांकनात त्याची फलंदाजांत चौथ्या स्थानापर्यंत घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टिव्ह स्मिथ ९३६ गुणांसह फलंदाजांत सर्वात पुढे आहे. त्यापाठोपाठ न्यूझीलंडचा केन विलीयम्सन ८६९ गुणांसह दुसऱया तर इंग्लंडचा ज्यो रूट ८४८ गुणांसह तिसऱया स्थानावर आहे. विलीयम्सनने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत १३० धावांची शतकी खेळी करीत फलंदाजांच्या गुणांकनात दोन स्थानांवर मजल मारली. हिंदुस्थानी फलंदाज चेतेश्वर पुजाराने आपले सहावे स्थान कायम राखले आहे.

अश्विन सर्वोत्तम अष्टपैलू

हिंदुस्थानी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने गोलंदाजी व फलंदाजीतील आपली कामगिरी ‘कांगांरू’विरुद्धच्या पहिल्या दोन कसोटींत कायम राखल्याने तो आयसीसी कसोटी गुणांकनात टॉपचा सर्वोत्तम क्रिकेटपटू बनला आहे. ४३४ गुण मिळवून अश्विनने बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकीब-उल- हसनला (४०३ गुण) ३१ गुणांनी मागे टाकत टॉपच्या स्थानावर मजल मारली. गोलंदाजीत अश्विन पहिल्या तर रवींद्र जाडेजा तिसऱया स्थानावर आहेत.

अफगाणिस्तानचा फलंदाज गेला कोहलीच्या पुढे

अफगाणिस्तानचा विस्फोटक फलंदाज मोहम्मद शहजादने एक खास उपलब्धी मिळविलीय. त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये हिंदुस्थानचा कर्णधार विराट कोहलीला धावांच्या बाबतीत पिछाडीवर टाकले. कोहलीला पिछाडीवर टाकून मोहम्मद शहजाद टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा चौथ्या क्रमांकाचा फलंदाज बनलाय. मोहम्मद शहजादने ५८ टी-२० सामन्यांत १७०९ धावा करत विराट कोहलीला मागे टाकले. कोहलीने ४८ सामन्यांत १७०९ धावा फटकावल्या आहेत. शहजादच्या नावावर कोहलीपेक्षा ७० धावा अधिक लागल्या असल्या तरी कोहलीने त्याच्यापेक्षा १० लढती कमी खेळल्या आहेत. शिवाय कोहलीच्या धावांची सरासरी अफगाणिस्तानच्या फलंदाजांपेक्षा सरस आहे. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टीलच्या नावावर असून श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशान व न्यूझीलंडचा ब्रॅण्डन मॅक्युल्यम अनुक्रमे दुसऱया व तिसऱया स्थानी आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या